Sangli Samachar

The Janshakti News

पाचवीला पुजलेल्या पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा, नितीन शिंदे यांची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ ऑगस्ट २०२४
हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी नुकतेच दत्तनगर, सूर्यवंशी प्लॉट, पटवर्धन कॉलनी, मगरमच्छ कॉलनी परिसरातील पुनर्वसन केलेल्या रोटरी क्लब, गणेश नगर येथील केंद्रात भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांचे चौकशी केली. 

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तीस ते पस्तीस फूट वाढ झाली की या भागातील नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. परिणामी 2005, 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरामध्ये येथील नागरिकांना स्थलांतरित लागले होते. या काळात नागरिकांची मोठे गैरसोय होते. या सर्वांचा रोजगार बुडतो. 

या वेळच्या महापुरामुळे नागरिकांना पुन्हा एकदा विस्थापित व्हावे लागल्यामुळे सर्वांनाच मनस्ताप सोसावा लागतो आहे. गेले आठ ते दहा दिवस हे पूरग्रस्त बांधव पुनर्वसन केंद्रात राहत आहेत. मुलांच्या शाळेची गैरसोय होत आहे तसेच काही मुले शाळेतही जाऊ शकत नाहीत. दरवर्षी महापुरामुळे या पूरग्रस्त नागरिकांची ससेहोलपट होते. प्रत्येक वर्षी आठ ते दहा दिवस या नागरिकांच्या घरात पाण्याचा मुक्काम असतो. चिखलाचे साम्राज्य असते. पूर ओसरल्यानंतर अस्वच्छतेमुळे या परिसरात रोगराई पसरते. 


या भागात राहणारे नागरिक हमाली, धुणीभांडी व स्वयंपाक करून, त्याचप्रमाणे खाजगी दुकानात नोकरी करीत आपला उदरनिर्वाह करीत असतात. या लोकांचे पोट दैनंदिन मजुरीवर अवलंबून असते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे नजीकच्या सरकारी जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे.

यावेळी आपली कैफियत मांडताना पूरग्रस्त बांधव म्हणाले की शासनाकडून जी मदत मिळते ती तुटपंजी असते राजकीय पुढारी केवळ प्रसिद्धीसाठी जी मदत करतात ती ही अत्यल्प असते. त्यामुळे आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी यावेळी अनेकांनी केली. आपण याचा शासन दरबारी निश्चित पाठपुरावा करून अशा आश्वासन यावेळी माजी आमदार नितीन शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले.