yuva MAharashtra लाल परीच्या ग्राहक राजांसाठी एसटी महामंडळांकडून प्रवासी राजा दिन !

लाल परीच्या ग्राहक राजांसाठी एसटी महामंडळांकडून प्रवासी राजा दिन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जुलै २०२४
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्यांचे 'लालपरी' अर्थात एसटी रस्त्यावर धावू लागली. सुरुवातीच्या काळात काही तांत्रिक संकटांचा सामना केल्यानंतर एसटीने आणि महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाने वेग घेतला. जनता या दोन्हीच्या कारभारावर खुश होती. पण... अलीकडील काही वर्षात अनेक कारणांमुळे एसटीची चाकांना समस्यांचा गंज लागला. आणि हिच्या कामाचा वेग मंदावला.

महामंडळात वाहक चालकांच्या समस्या दूर करण्यासाठी निर्माण झालेली संघटना, तिच्यातील फूट, लोकप्रियतेच्या अति हव्यासापोटी शासनाने प्रवाशांना दिलेली सूट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिरसस्थ व्यवस्थापनापासून ते तालुका पातळी पर्यंत पसरलेल्या महामंडळाच्या विविध विभागातील खाबुगिरी. या साऱ्यांचा परिणाम 'लाल परी'च्या अर्थकारणावर झाला. एसटीची चाके तोट्याच्या दलदलीत फसू लागली.


परिणामी प्रवाशांच्या सेवेतील वाहनांची दुर्दशा आणि चालक, वाहकांची प्रवाशांशी वर्तणूक हा कळीचा मुद्दा ठरला. सातत्यानेच प्रवाशांना याचा फटका प्रवाशांना बसत असतो. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हे कस्तुत्य उपक्रम सुरू केला असून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना यांचे पातळीवर जलद गतीने निराकरण होण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी प्रत्येक आगारात ' प्रवासी राजा दिन' आयोजित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांचे ही संकल्पना.

15 जुलैपासून संपूर्ण राज्यात या उपक्रमाचे सुरुवात होणार असून, एसटीचे विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांशी संवाद साधतील. त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण होण्यासाठी उपाययोजनाही करतील. यातून प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्याचा महामंडळाचा विचार आहे. यासाठी प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालय व प्रवासी आपल्या समस्यांचे लेखी स्वरुपात दर सोमवारी व शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत संबंधित आगारात तक्रार दाखल करू शकतात यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील.

प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होईल याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक ठरवणार असून प्रत्येकाची लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार आहे. तितकेच नव्हे तर त्यावर काय कार्यवाही केले याचीही नोंद ठेवले जाईल. या साऱ्यावर थेट मध्यवर्ती कार्यालयाचे लक्ष असेल.


यामुळे दररोज दररोज 54 ते 55 लाख राज्यभरातील प्रवास करणाऱ्या प्रवासी राजाला खरोखरच आपण 'राजा' असल्याची जाणीव होणार असून, या उपक्रमाबद्दल प्रवाशा मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.