| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जुलै २०२४
सांगली जिल्ह्यातील विटा, इस्लामपूर, शिराळा, पलूस या तालुक्यातील सात पुलावर पाणी आल्याने बस सेवा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पूर परिस्थिती बरोबरच हक्काची बस वाहतूक सेवा बंद झाल्याने, मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता त्यांची भिस्त वडाप वाहतुकीवर अवलंबून आहे.
इस्लामपूर कोडोली मार्गावरील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील बस सेवा पूर्ण रद्द करण्यात आली आहे. विटा कडेगाव मार्गावरील रामापुर पुलावरील पाण्यामुळे या मार्गावरीलही बस सेवा बलवडी फाटा रामापुर या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. शिराळा कांडवण मार्गावरील शित्तूर पुलावर पाणी आल्याने या मार्गावर आता मणदूर पर्यंतच बस सोडण्यात आली आहे. शिराळा बांबवडे मार्गावरील सागाव पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील बस सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. पलूस कोल्हापूर मार्गावरील अमणापूर ते अंकलखोप पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक आता इस्लामपूर व सांगली मार्गे बळवण्यात आली आहे.