yuva MAharashtra मिरजेतील शिवछत्रपती शिवाजी मार्ग धोकादायक वळणावर !

मिरजेतील शिवछत्रपती शिवाजी मार्ग धोकादायक वळणावर !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १४ जुलै २०२४
मिरजेतील सर्वात रहदारीचा आणि प्रमुख असलेला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. मग तो नूतनीकरणानंतरचा असो किंवा पूर्वीचा. 

या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून कासव गतीने सुरू आहे. याबाबत मिरज शहर सुधार समितीसह अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. परंतु झोपेचे सोंग घेतलेले अधिकारी, याकडे गांभीर्याने पाहावयास तयार नाहीत असा आरोप केला जात आहे. या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत.  

मिरज शहर हे वैद्यकीय नगरी म्हणून ओळखली जाते. रेल्वे जंक्शनमुळे ही या शहराची दूरवर ओळख आहे. या दोन्ही कारणांमुळे शहरात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मध्यंतरी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे वर्ग केल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. यामध्येही अनेक उचापती झाल्या. पूर्णत्वाकडे जाणारा हा मार्ग आता चर्चेत आला आहे तो, यावरील अपूर्ण दुभाजकामुळे.

या महामार्गावर रस्ता दुभाजकाचे काम सुरू आहे. परंतु अर्धवट असलेल्या या कामामुळे वारंवार येथे अपघाताचे टांगती तलवार वाहनधारकावर आहे. या दुभाजकाच्या अपूर्ण कामाजवळ रिफ्लेक्टवर किंवा लाल झेंडे लावण्याची आवश्यकता आहे. रात्रीच्या वेळी अनोळखी वाहन चालकांना अपूर्ण असलेले हे दुभाजक पटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे येथे कायम छोटे-मोठे अपघात होत असल्याचे बोलले जाते.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेश भाऊ खाडे यांनी अथक परिश्रमाने या रस्त्यासाठी 27 कोटी रुपये आणले आहेत. त्यामुळे त्यांनीच आता याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी मिरज-करांकडून होत आहे.