| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जुलै २०२४
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाआघाडी आपल्या मित्र पक्षांबरोबर जागा वाटपांबाबत चर्चा करताना दिसत आहेत. लोकसभेला झालेली चूक सुधारत दोन्ही आघाडीतून एकास एक उमेदवार देण्याची तयारी सुरू झालेली आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीवर कुरघोडी करीत, महाआघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपात समसमान वाटणीवरून एकमत झाले असल्याची खबर आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी '90-90' चा फॉर्म्युला अवलंब करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांची माहिती आहे. आता या दोघांना महाआघाडीतील इतर पक्षांच्या विशेषतः काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
परंतु दोनच दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी प्रथम 'मुख्यमंत्र्यांचा चेहरा' कोण हे ठरवून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून महाआघाडीत संशय कल्लोळ हे माजला होता. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी मध्यंतरी राज्यातील सर्व 288 जागावर चाचणी करण्याचे आदेश काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना दिले होते. त्यानंतर सर्व मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागवण्याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्षांना धाडले होते. यावरून काँग्रेस स्वतंत्र लढणार का ? अशी शंका व्यक्त होत असतानाच, महाआघाडीतील पवार व ठाकरे गटाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.