| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणावर महायुती आणि महाआघाडी एकमेकाचे शरसंधान करण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठीचे रणनीतीही तयार करण्यात आली आहे. अर्थात यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर वारंवार बदल होणार असला तरी सध्या चर्चेत आहे ती भाजपचे विरोधकांकडून होणाऱ्या आरोपापासून रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेली नेत्यांचे कवच कुंडले... अर्थात दहा नेत्यांची टीम... जे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी दिवसाच्या उगवतीला आणि मावळतेला थेट उत्तरे देतील... याशिवाय बोलती बंद करण्यासाठी त्यांच्यातील उणिवा शोधून त्यावर घणाघात करतील...
आताही कवचकुंडले भेदण्यासाठी आणि नवनवे आरोप करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली असून, 15 नेत्यांची आणि प्रवक्त्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आणि गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा यांना आता कॉंग्रेस पक्षाने प्रवक्त्यांची जबाबदारी दिली आहे. यांच्या समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे दिली आहे.
सत्ताधारी पक्षाकडून 'फेक नेरेटिव्ह' पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु केले असून आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो,व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरवित आहे. जनतेला सत्य समजावे आणि सत्ताधाऱ्यांच्या 'फेक नेरेटिव्ह' पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 15 नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.