| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जुलै २०२४
शासन काँग्रेसच असो, भाजपचा असो की आघाडीचं... निवडणूका जवळ आल्या की विविध योजनातून जनसामान्यावर भडीमार केला जातो. 'आता तो आधारासाठी असतो की आहेरासाठी ?' या प्रश्नातच खरं तर उत्तर दडलेलं... सध्या महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचा वारं वाहतं आहे. आणि ही वाऱ्याची झुळूक सर्वसामान्यांच्या मनाला मात्र आनंद देत आहे...
नुकतीच महाराष्ट्र शासनाने ' मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना सुरू केली. त्यानंतर ' वयोश्री योजना' आणली. यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. बहीण झाली, वयोवृद्ध झाले... मग भावानेच काय केलंय ? असा सवाल विरोधकाने विधानसभेत उपस्थित केला. आणि हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी काल, ' लाडका भाऊ योजना' सुरू करीत असल्याचे जाहीर केले. या योजनेंतर्गत राज्यातील तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे...
तरुणांसाठी खास योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एका खास योजना जाहीर केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना जाहीर केल्या. या योजनांमध्ये याजनेचा समावेश आहे. युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत 10 लाख सुशिक्षित तरुणांना 10 हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड दिला जाणार आहे. ही तरुणांसाठी असलेली लाकडा भाऊ योजना असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनावर टीका करीत हक्कभंग आणण्याची तयारी केली होती. याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये अध्यक्षांना निवेदनही दिले होते. कोणताही जीआर काढण्यात येतो तो सभागृहाच्या पटलावर चर्चा होऊन, मात्र शिंदे सरकारने कोणतीही चर्चा न करता थेट जीआर काढण्यात आल्यानं हक्कभंग आणण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला होता. केवळ होर्डिंग साठी ही योजना जाहीर केल्याची टीकाही त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केले होती. पण विधानसभेचे सुप वाजल्याने हक्कभंग ठराव सध्यातरी बारगळलेला दिसतो.
आता या साऱ्यात, जनसामान्यांना 'आधार मिळो की आहेर'... सध्या तरी फायदा होतोय ना ? मग आपण कशाला काय बोला ?... खरं की नाही ?