| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जुलै २०२४
बार्बाडोस येथे टी ट्वेंटी विश्वचषकावर देशाचे नाव कोरल्यानंतर, भारतीय क्रिकेट टीम खास विमानाने प्रथम दिल्ली येथे पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आणि टीम डायरेक्ट मुंबईला पोहोचली. मरीन ड्राईव्ह ते वानखडे स्टेडियम पर्यंत आपल्या लाडक्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर अक्षरशा जनसागर उसळलेला होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे चाहते जिथे जागा मिळेल तेथून आपल्या लाडक्या टीम सदस्यांचे व्हिडिओ काढत होते.
यादरम्यान एका चाहत्याने असे काही केले की, काही काळ टीम इंडियातील सभेचेही आवाक् झाले. त्यानंतर भारतीय कप्तान याने त्या चाहत्याला जमिनीवर येण्यास भाग पाडले. त्याचे झाले असे, चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूंचा व्हिडिओ काढायचा होता. परंतु रस्त्यावरील गर्दीमुळे एका चाहत्याला व्हिडिओ काढता येत नव्हता, म्हणून तो चक्क एका झाडाच्या फांदीच्या टोकापर्यंत पोहोचून व्हिडिओ काढत होता.
ही बाब सर्वात आधी यशस्वी जैस्वालला लक्षात आली. त्यानंतर विराट कोहलीनंही हा प्रकार पाहिला. क्रिकेटपटूंना त्या चाहत्याची चिंता वाटू लागली. विराट कोहलीनं लागलीच ही बाब कर्णधार रोहित शर्माच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर मुंबईकर रोहित शर्मानं आपल्या स्टाईलमध्ये त्या चाहत्याला झाडावरून खाली उतरायला सांगितलं. त्यापाठोपाठ इतरही क्रिकेटपटूंनी त्या चाहत्याला खाली उतरायला सांगितलं. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत सर्वच नागरिकांना आवाहन केले आहे की, फोटो काढण्यासाठी क्रिकेट चाहत्याने केलेल्या मेहनतीसंदर्भात 'या मेहनतीचे फळ घातक ठरू शकते' असं पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. 'भारतीय क्रिकेट संघाविषयी असलेले प्रेम आम्ही समजू शकतो, पण ते असे व्यक्त करणे धोक्याचे ठरू शकते', असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.