Sangli Samachar

The Janshakti News

आगामी विधानसभा निवडणुकीत अमित शहा, अजित पवार यांच्या भेटीला महत्त्व !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १५ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीत प्रभावी कामगिरी केलेल्या महाविकास आघाडीला रोखायचे असेल, तर महायुतीतील घटक पक्षांना समान वागणूक दिली जावी. या मागणीसह इतर मागण्या घेऊन अजित पवार भाजपचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी घटक पक्षांना भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीबाबत तक्रार केली. 

यावेळी अमित शहा यांनी सत्ताधारी आघाडीच्या सर्वच मित्र पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सामावून घेत, समान न्याय दिला जाईल याची हमी दिली. दोनच आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनीही आपल्याला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबाबत आणि महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीबाबत सविस्तर चर्चा केली होती.


आजच्या पवार-शहा यांच्या भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला थोपवायचे असेल तर, अधिकाधिक निधी महाराष्ट्राला मिळायला हवा, अनेक लोकप्रिय योजना राबवायला हव्यात, असे अजित पवार यांनी अमित शहा यांना सांगितले.

मध्यंतरी आगामी निवडणुकीत भाजपाने 120 पेक्षा अधिक जागावर लढण्याची तयारी केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे पवार गटात खळबळ माजली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेट लक्षात घेऊन जागावाटप व्हावे, अशी मागणी ही शिंदे व पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचे अधिकृत सूत्राने सांगितले.