| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जुलै २०२४
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे, अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या सर्व पूरग्रस्तांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल व पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागोजागी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. पूरग्रस्तांमध्ये साथीचे आजार पसरू नयेत यासाठी पूर्ण खबरदारी या टीमकडून घेतली जात आहे. शुक्रवारी आणि शनिवारी एकूण चारशेहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.
महापुराच्या काळात विस्थापित झालेल्या लोकांना निवारा आणि भोजनाची व्यवस्था आहेच, मात्र त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो. साथीचे आजार पसरण्याची भीती असते. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांनी ग्रासलेले अनेक रुग्ण असतात. त्यांना वेळेवर आणि जागेवर उपचार उपलब्ध करून देत, गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल व पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.
महापालिका शाळा नंबर २३ आणि १७ इथे आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. संतोष भोसगे, डॉ. विवेक घाटगे आणि त्यांच्या टीमने प्रत्येक पूरग्रस्ताची आरोग्य तपासणी केली. त्यांना मोफत औषधे दिली. रुग्णांची हिस्ट्री समजून घेऊन त्यांनी या काळात काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
यापैकी एका रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होता. या रुग्णावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता होती. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी तातडीने मिरजेतील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ रियाज मुजावर यांच्याशी संपर्क साधला. या रुग्णाला रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आणि डॉक्टरांनी लागलीच त्यांची तपासणी करून पुढील उपचार सुरू केले.
श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, की पूरग्रस्तांना घरातून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंतची सगळी सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. या संकटाच्या काळात सगळे पक्षभेद राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजुटीने काम करावे असा आमचा प्रयत्न आहे. कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास लोकांनी आमच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी केले.