| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ८ जुलै २०२४
किल्ले विशाळगडावर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. यासाठी 13 जुलै रोजी माझ्यासह सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार आहेत. आता त्याला कोणीही रोखू शकत नाही. आम्हाला पोलिसांचे भीती दाखवा, पण आम्ही घाबरणार नाही. अशा शब्दात छत्रपती संभाजी राजे विशाळगडावरील अतिक्रमणावरून आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर आज संभाजी राजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ,13 जुलै रोजी 'चलो विशाळगड'चा नारा दिला आहे. आता गप्प बसून चालणार नाही, कुठेतरी ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. असं संभाजी राजे यांनी म्हटले आहे.
अन्याया विरोधात उभे राहणे हीच माझी भूमिका असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवणे ही समाजाची भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, संभाजी राजे तुमच्या मनातील विशाळगड आहे, तोच आमच्याही मनात आहे असे सांगितले होते. आता आम्हाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मनातील विशाळगड बघायचा असल्याचेही संभाजी राजेंनी म्हटले आहे.
दरम्यान सध्या विशाळगडावरील अतिक्रमण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे शासन आणि पोलीस काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.