Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जून २०२४
कसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. जो एकमताने मान्य झाला आहे. यातच राहुल गांधींना लोकसभेचे विरोधी पक्षनेते करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबतचा प्रस्तावही काँग्रेसच्या बैठकीत मांडण्यात आला, जो पास झाला आहे. मात्र राहुल गांधी यांनी याबाबत अद्याप आपला निर्णय कळवलेला नाही. यातच आता काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची इच्छा आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावावी.

या निवडणुकीत राहुल गांधींनी ज्या आक्रमकतेने भाजपचा सामना केला आणि ज्या पद्धतीने त्यांनी मोदींना कोंडीत पकडले ते निवडणुकीच्या निकालात दिसून आले आहे, असं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत लोकसभेत काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्यासाठी आता राहुल यांनी विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते करत आहेत.

मात्र राहुल गांधी यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर न केल्याने काँग्रेस नेते संभ्रमात आहेत. हीच योग्य वेळ आहे, राहुल गांधींनी तातडीने निर्णय घ्यावा, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. आता राहुल गांधी काय निर्णय घेतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.