Sangli Samachar

The Janshakti News

पाणीच पाणी चोहीकडे गेला रस्ता कुणीकडे ? सांगलीकरांचे हाल, बेहाल !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जून २०२४
सांगली शहरासह उपनगरांना काल (8 जून) रात्री दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास तासभर पाऊस चालू होता. यामुळे शहरातील प्रमुख चौकात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते.

स्टँडजवळील झुलेलाल चौक, मारुती चौक आणि भाजी मंडई रोडवर तर गुडघाभर पाणी साचून या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. स्टेशन चौक, राममंदिर चौक, मारुती चौक, शिवाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. यामुळे नागरिकांची हाल झाले. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना मान्सून पावसाची चाहूल लागली असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे. तासगाव-मिरज पुर्व भागासह शिराळा-वाळवा तालुक्यांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली.


दरम्यान प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. जेणेकरून पावसाचे पाणी साठवून राहू नये आणि नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये. पण "नेमिची येतो मग पावसाळा आणि उडतो बोजवारा नालेसफाईचा !" असाच प्रकार यंदाही पहावयास मिळत आहे. नूतन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता हे शहरातील समस्या जाणून घेत, त्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत. आता या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या मनस्तापावर ते काय तोडगा काढतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.