Sangli Samachar

The Janshakti News

"हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कायम..."; शरद पवारांचं मोदींना नवं आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली होती. भटकती आत्मा सत्तेसाठी आसुसलेला आहे, अशा स्वरुपाचं वक्तव्य त्यांनी पवारांचं नाव न घेता केलं होतं. या टीकेचा उल्लेख करताना हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कायम तुम्हाला त्रास देत राहिलं, अशा आशयाचं विधान शरद पवार यांनी केलं आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अल्पसंख्यांकांना मोदी मुद्दाम विसरले

शरद पवार म्हणाले, "मोदींचा प्रचाराबाबत काय सांगायचं? प्रधानमंत्रीपदावरच्या व्यक्तीनं देशाच्या सर्व जाती-धर्म घटकाचा विचार केला नाही. मला वाटतं ते विसरले होते पण ते विसरले नाहीत त्यांनी मुद्दाम हे केलं. कारण त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. अल्पसंख्याक या देशाचा महत्वाचा घटक आहे मग तो मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शिख असेल किंवा पारशी आणि कुठल्याही जाती-जमातीचा असेल.

या लोकांना विश्वास देण्याची कामगिरी राज्यकर्त्यांनी करायची असते पण मोदी यामध्ये कमी पडले. त्यांनी भाषण करताना सांगितलं की, या देशात ज्यांच्या घरात मुलं जास्त जन्माला येतात त्यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घरातील भगिनींचं मंगळसूत्र ते काढून घेतील. प्रधानमंत्र्यांनी हे बोलायचं असतं का? पण त्याचं तारतम्य ठेवायची मर्यादा त्यांनी पाळली नाही"

हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही

"राजकीय पक्ष आम्ही एकमेकांवर टीका करतो पण त्यातही मर्यादा ठेवतो. ते माझ्याबाबतीत बोलले की हा भटकता आत्मा आहे. एकादृष्टीनं ते हे बोलले ते बरं झालं कारण की, आत्मा हा कायम राहतो. त्यामुळं हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही"

मोदींची गॅरंटी संपली

मोदींनी आज शपथ घेतली पण तत्पूर्वी त्यांना या देशाची संमती होती का? त्यांचं बहुमत नव्हतं बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली त्यामुळं त्यांचं राज्य झालेलं आहे. आजच सरकार हे वेगळं सरकार आहे. या निवडणुकीच्या काळात मोदी जातील त्या ठिकाणी ते भारताचं सरकार कधी म्हणतं नव्हते फक्त मोदी सरकार आणि मोदी गॅरंटी असं म्हणत होते. पण आता मोदींची गॅरंटी संपली.

आज तुमच्या लोकशाहीच्या मतदानाच्या जोरावर मोदींना हे सांगाव लागलं की हे मोदी सरकार नाही भारत सरकार आहे. पण ठीक आहे त्यांचं सोडून द्या आपण आता पुढं जायचं आहे. महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या तीन राज्यात तीन महिन्यांनी निवडणुका आहेत या ठिकाणी आपल्याला कष्ट करायचं आहे आणि आपलं सरकार आणायचं आहे.