Sangli Samachar

The Janshakti News

श्रीरामांच्या अंगणात भाजपाचा पराभव का झाला ?



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ जून २०२४
2019 साली सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिराच्या बाजूनं निकाल दिला आणि त्याच क्षणापासून राम मंदिर बांधकामाला सुरूवात झाली. 22 जानेवारीला अत्यंत सुरेख, भव्य अशा राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यावेळी न भूतो न भविष्यति असा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण जगानं पाहिला. या मंदिराच्या बांधकामासह संपूर्ण अयोध्या नगरीचा कायापालट भाजपा सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात झाला. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येत भाजपा बहुमताने विजयी होणार अशी गॅरंटी जवळपास सर्वांनाच होती, परंतु घडलं उलट. अयोध्येत भाजपाला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे इथं भाजपाचं गणित नेमकं बिघडलं कुठं याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांच्या मनातही विविध तर्कवितर्क लढवले जाताहेत.

अयोध्येच्या साधू-संतांनी हा पराभव अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं. हिंदूंच्या 500 वर्षांच्या लढ्याला ज्यांनी सुखद विजय मिळवून दिला, अयोध्येत ज्यांनी नवा इतिहास रचला, त्या भाजपाला जनतेनं मत दिलं नाही, हे लज्जास्पद असल्याचं साधू-संतांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे अयोध्येत 35000 हून अधिक मतदारांनी यंदा मतदान केलंच नाही असंही म्हटलं जातंय आणि हेच या निकालामागचं प्रमुख कारणही मानलं जातंय.


तर, दुसरीकडे सतत व्हीआयपी मुमेंटच्या नावाखाली सार्वजनिक सेवांवर बंदी घालणं याचा परिणाम निकालात दिसून आल्याचं अयोध्येच्या सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे. शिवाय अयोध्या मंदिर परिसर सोडून इतर ठिकाणी हवा तसा विकास पाहायला मिळाला नाही, अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.

दरम्यान, फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार, विद्यमान खासदार लल्लू सिंह यांना सपा उमेदवार अवधेश प्रसाद यांनी पराभूत केलं. लल्लू सिंह यांना 499722 मतं मिळाली, तर 554289 मतं मिळवून अवधेश प्रसाद 54567 मतांनी विजयी झाले. हा तोच फैजाबाद लोकसभा मतदारसंघ आहे, ज्याला म्हणतात अयोध्या.