Sangli Samachar

The Janshakti News

अति घाई रामलल्लाच्या मंदिरात पाणी जाई ! देशभरातील रामभक्तांमधून नाराजी !सांगली समाचार वृत्त |
अयोध्या - दि. २४ जून २०२४
राम नगरी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उद्घाटनास अजून सहा महिनेही झाले नाहीत, मात्र पहिल्यात पावसाने राम मंदिराच्या छताला गळती लागली आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, पहिल्याच पावसात छतातून पाणी टपकू लागले आहे. गर्भगृहात जेथे रामलल्ला विराजमान आहे, तेथे पाणी साचले आहे.

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी राम मंदिराला गळती लागल्याची पुष्टी करताना सांगितले की, राम मंदिराच्या छतातून पहिल्याच पावसाने पाणी टपकू लागले आहे. त्यांनी म्हटले की, यावर एक-दोन दिवसात जर उपाय केला नाही तर दर्शन आणि मंदिरातील पूजा-अर्चा बंद करावी लागेल. अयोध्येत शनिवारी रात्री दोन ते पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. गर्भगृहाच्या समोरील मंडपात चार इंचापर्यंत पाणी साचले. या पाण्यात इलेक्ट्रीक करंट उतरण्याची लोकांना भीती वाटत होती. यामुळे पहाटे चार वाजताची आरती बॅटरीच्या उजेडात करावी लागली. सहा वाजताची आरतीही अशीच केली गेली.


सत्येंद्र दास यांनी म्हटले की, मंदिर परिसरात जी छोटी मंदिरे बनवण्यात आली आहेत, त्यामध्येही पाणी जमा झाले. राम मंदिराच्या बांधकामात कोठे कमतरता राहिली, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, एकतर राम मंदिरात साचलेल्या पाण्याच्या विसर्गाची व्यवस्था नाही. त्यातच मंदिराच्या छतातूनही पाणी पाझरु लागले आहे. राम लल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दावा केला की, बांधकामात हलगर्जीपणी झाला आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर जेव्हा सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा सगळीकडे पाणी जमा झाल्याचे दिसले. मोठ्या मुश्किलीने मंदिरातील पाणी बाहेर काढले गेले.

गुरु मंडप खुला असल्यामुळे आले पाणी -नृपेंद्र मिश्रा

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याबाबत सांगितले की, मी अयोध्येतच आहे. मी मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून पावसाचे पाणी येताना पाहिले आहे. असे होणे अपेक्षित आहे, कारण गुरु मंडप खुला आहे. दुसरा मजला व शिखराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते झाकले जाईल. त्यांनी म्हटले की, मी छतातून पाण्याची गळती होतानाही पाहिले आहे. पहिल्या मजल्यावर अजूनही काही काम सुरू आहे. काम पूर्ण होताच नाली बंद केली जाईल. गर्भगृहातील पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. कारण सर्व मंडपातून पाणी घालवण्यासाठी उतार केला जातो. मात्र गर्भगृहातील पाणी मॅनुअली काढले जाते. भाविक मूर्तीवर अभिषेक करत नाहीत. त्यामुळे डिझाइन किंवा बांधकामाचा मुद्दा नाही. जे मंडप खुले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नागर वास्तुशिल्पानुसार हे खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.