Sangli Samachar

The Janshakti News

मिरज मालगाव वाहतूक पर्यायी मार्गाने; मिरज सुधार समितीच्या आंदोलनाचे यश !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ११ जून २०२४
मिरज-मालगांव मार्गावर दिंडीवेसजवळ पुलाचे काम असल्याने पुलाशेजारी तयार करण्यात आलेला वळणाचा पर्यायी रस्ता पावसाळ्यात वाहून गेला आहे. म्हणून या मार्गावरील दुचाकी व लहान चारचाकी वाहने सांगलीकर मळ्यामार्गे सोडण्याचा तसेच, अवजड वाहने सुभाषनगर, टाकळी रोड मार्गे मिरजेस सोडण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. बांधकाम अधिकारी व मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मिरज-मालगांव मार्गावर दिंडीवेसजवळ ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे. पुलाशेजारी वळणाचा पर्यायी रस्ता करताना पाईपलाईन टाकण्यात आले नसल्याने हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे. नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त आहे. याबाबत मिरज सुधार समितीने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना जाब विचारल्यानंतर मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांच्या दालनात सुधारवादी कार्यकर्ते व नागरिकांची बैठक झाली.


शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ता बाबत चर्चा झाली. सांगलीकर मळ्यातील रस्त्याची डागडुजी, रस्ताशेजारी झाडेझुडपे हटवून या मार्गावर दुचाकी व लहान चाकी वाहने सोडण्याचा तसेच, अवजड वाहने अवजड वाहने सुभाषनगर, टाकळी रोड मार्गे सोडण्याचा निर्णय झाला. याबाबत वाहनधारकांना सुचित करण्यासाठी सुभाषनगर चौकात तसेच, दिंडीवेस चौकात मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे तसेच या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता किशोर पवार यांनी सांगितले. 

यावेळी शाखा अभियंता धैर्यशील रणदिवे, मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, राजेंद्र झेंडे, सुनील गुळवणे, अभिजीत दाणेकर, वसीम सय्यद, धनंजय शिंदे, नरेश सातपुते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.