सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
सांगली जिल्हा बँक मागच्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान घोटाळा आणि विविध कारणांवरून गाजलेल्या बँकेची प्रगती मात्र चांगल्या दिशेने चालली आहे. बँकेने मागील अडीच वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे राज्यातील पहिला पाच जिल्हा बँकांमध्ये समावेश झाला आहे. बँकेच्या प्रगतीचे सहकार मंत्री, सहकार आयुक्तांनी कौतुक केले. दरम्यान ही घटना ताजी असतानाच बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी नवीन योजना आणल्याने बँक पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात दुष्काळ असतानाही ठेवींमध्ये तब्बल एक हजार कोटींची वाढ झाली, अशी माहिती बँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
यावेळेस ते म्हणाले की, 'शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तातडीने ५० हजार रुपये अल्प व्याजात देण्याचे धोरण जिल्हा बँकेने घेतलेले आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करीत आहे. त्यासाठीची तरतूद बँकेच्या नफ्यातून केली जात आहे. जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना आम्ही पीक कर्जेही तोटा सहन करून देत आहोत, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
संचालक मंडळावर शेतकऱ्यांचा विश्वास
अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, सामान्य शेतकरी, बँकेचे सभासदांचा जिल्हा बँकेवर, संचालकांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळात बँक ठेवी एक हजार कोटींनी वाढल्या, ही विश्वासाची पोचपावती आहे. मार्च-२५ अखेर बँक प्रगतीची आणखी शिखरे पार करेल.
बँकेची प्रगती विरोधकांना बघवत नाही
बँकेच्या मागील संचालक मंडळाची याआधीच शासनाने चौकशी सुरू केली आहे. यातून सत्य बाहेर येईल. राज्यात विरोधक सत्तेवर आहेत. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास नाही का? बँकेवर मोर्चा काढून बँकेच्या व माझ्या बदनामीचे राजकारण विरोधक करत आहेत. अडीच वर्षांत मी केलेली बँकेची प्रगती त्यांना बघवत नाही, त्यांना पोटशूळ उठले आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकरी, सभासदांचा संचालकांवर पूर्ण विश्वास आहे.