| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जून २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळीच्या सधन कुटुंबातील ३२ वर्षीय तरूण, नितीश कुमार पाटील हा फिटच्या आजाराने त्रस्त होता. आठवड्यापूर्वी त्याचा आजार अधिकच बळावला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही. अखेर त्याचे कार्य थांबले. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्या कुटुंबाने त्याच्या अवयवातून आठवणी तेवत ठेवण्यासाठी अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाने हृदय, यकृत, दोन किडनी, दोन डोळे, त्वचा दान देत आठ ते नऊ जणांना जीवदान मिळाले.
नितीश आज नसला तरी त्याच्या हृदयाची धडधड आजही सुरू आहे. या कार्यात पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर करत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला. कुटुंबीयांनी भरल्या डोळ्यांनी हात जोडत निरोप दिला. वैद्यकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे कामगिरी मंगळवारी उषःकाल हॉस्पिटलचा माध्यमातून आठवड्यात दुसऱ्यांदा आणि वर्षात तिसऱ्यांदा फत्ते झाली. रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद पारेख, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद मालाणी यांनी समुपदेशन केले. त्यानुसार आजचा दिवस ठरला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, पोलीस अधिक्षक संदीप घुगे त्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'ग्रीन कॉरिडोर' करण्याचे नियोजन झाले.
दुसऱ्यांदा अवयव दान !नितीन पाटील यांच्या घरात हे दुसरे अवयवदान. नितीन पाटील यांच्या काकू ललिता साधू गुंडा पाटील यांनीही अवयवदान केले होते. त्यावेळी सांगलीकरांनी पहिल्यांदा 'ग्रीन कॉरिडोर'चा थरार अनुभवला होता. या आठवड्यात दुसऱ्यांदा 'ग्रीन कॉरिडोर, करण्यात आले. सांगलीतील डॉ. हेमा चौधरी व डॉ. सार्थक पाटील यांची टीम सातत्याने अवयवदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. याचमुळे समाजात याबाबत जनजागृती होऊन अनेकांना जीवनदान मिळत आहेत !
मुंबईतील एका रुग्णास हृदयाची गरज होती. मुंबईला जाण्यासाठी एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था यावेळी करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास रुग्णवाहिका सज्ज केली. पोलिसांनी सायरन देत रस्ते मोकळे केले. त्यासाठी दहा पोलीस नियुक्त करण्यात आले होते. 34 मिनिटात 50 किलोमीटरच्या अंतर कापत रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचली.
12: 30 च्या सुमारास मुंबईतील रुग्णालयात हृदय पोहोचले आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. यकृत, दोन किडण्या जिल्ह्यात येणार होते. त्यासाठी 10: 30 वाजता पुन्हा रुग्णवाहिका सज्ज झाली. जलद गतीने यंत्रणा कामाला लागली. कर्नाळ - पलूस मार्गे कराडला ताफा निघाला. सव्वातीन तासात पुण्यात रुग्णवाहिका पोहोचली आणि प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. तसेच सांगलीतील दोन रुग्णांना नेत्रदान करण्यात आले. त्वचादानही करण्यात आले.
आईने घेतला पुढाकारछातीवर दगड ठेवून या अवयवादानाचा निर्णय नितीनच्या आईने घेतला. त्याला नितीन चे वडील व मुलाने ही साथ दिली. या निर्णयातून नितीन आपल्यात कायमस्वरूपी राहणार आहे, अशी भावना हुंदके देत त्यांनी व्यक्त केली. हात जोडून मुलाला निरोप देताना त्या माऊलीच्या डोळे पाणवले आणि ती हमसून रडू लागली. या भावनेत क्षणाने रुग्णालयातील सारेच स्तब्ध झाले होते. या कर्तव्यदक्ष माऊलीला साऱ्यांनीच सलाम केला !
आठवड्यातील दुसरी कामगिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ मिलिंद पारेख डॉ आनंद मालाणी, डॉ. संजीव कोंगेकर, डॉ दिगंबर माळी यांच्या टीमने फत्ते केली. या सर्व टीमचे वैद्यकीय क्षेत्रात आणि समाजात कौतुक होत आहे.