Sangli Samachar

The Janshakti News

पराभवाची जबाबदारी स्वीकारात देवेंद्र फडणवीस यांचा धक्कादायक निर्णय !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत पराभवासंदर्भात विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजपचा पराभव का झाला ? त्याचे कारणे माध्यमांना सांगितली. मराठा आरक्षण, शेतीमालास भाव हे प्रश्न कळीचे मुद्दे ठरले. तसेच संविधान बदलणार असल्याचा जो प्रचार केला गेला, त्याचा फटका भाजपला बसला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे धक्कादायक विधान देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची कारणे सांगताना म्हटले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो. शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाले. त्यानंतर आम्ही मदत केली. परंतु आचारसंहितेमुळे तो निर्णय आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकलो नाही.


पराभवाची कारणे सांगितली

महायुतीच्या पराभवाची कारणे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी सांगितली. फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली. महायुती २ कोटी ४८ लाख म्हणजे मते मिळाली. म्हणजे फक्त दोन लाख मते कमी मिळाली. मुंबईत महाविकास आघाडीला २४ लाख मते मिळाली. महायुतीला २६ लाख म्हणजे दोन लाख मते जास्त मिळाली आहेत. त्यानंतर चार जागा गेल्या. 

राज्यातील आठ जागांवर ४ टक्के मतांचा फरक राहिला. तसेच ६ जागांवर ३० हजार मते कमी मिळाली. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २७. ८४ टक्के मते होती. त्यावर २३ जागा होती. यावेळी २६.१७ टक्के मिळाली. त्यानंतर केवळ ९ जागा मिळाल्या. काँग्रेसला २०१९ मध्ये १६.४१ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी एक जागा होती. आता १७ टक्के मते मिळून त्यांच्या जागा १३ झाल्या.