Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या जागेवरून नाना पटोले - संजय राऊत यांच्यात धुमशान !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जून २०२४
देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची आकडेवारी दाखवणारे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार आता राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चांगलीच टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. याच पोलवरुन महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून आघाडीसाठी वादाचा मुद्दा ठरलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवरुन एक्झिट पोलनंतरही आघाडीत दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगली मतदारसंघाची जागा अपक्ष उमेदवारासाठी अनुकूल असल्याच्या पोलच्या निकालावरुन काँग्रेसला लक्ष केलं. "आम्ही राजकारणात गोट्या खेळायला आलेलो नाही", असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. तर त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. 'संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली' अशी कोपरखळी त्यांनी राऊतांना लगावली. एक्झिट पोलसंदर्भात राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "आम्हाला महाराष्ट्रात काय होते, हे माहिती आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागणार, कोणता अपक्ष जिंकणार हे सुद्धा मला माहिती आहे. मी सांगलीवर बोलेन आणि बोलणारच आहे.


आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आम्ही येथे गोट्या खेळायला बसलेलो नाही." तसंच राज्यात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल, आम्हाला एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते असून. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं. त्यामुळे जनतेचा कल आम्हाला माहिती आहे. त्यासाठी आम्हाला तपस्या आणि साधनेची गरज आम्हाला नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचलं.

राऊत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली

राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, "राजकारणात कोणीच गोट्या खेळायला बसलेलं नाही. मात्र तुम्ही 100 टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 समाजकारण करतो. राऊत ज्या शाळेत शिकलेत ती शाळा काँग्रेसने निर्माण केली आहे. त्यांचा जन्म झाला ते रुग्णालयदेखील काँग्रेसने निर्माण केलं आहे. ते कालच लंडनहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तिथल्या थंडीचा परिणाम आहे की इथल्या उन्हाचा, हे बघितलं पाहिजे." असं म्हणत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला. त्यामुळे आता निकालाआधीच आघाडीतील नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.