Sangli Samachar

The Janshakti News

मानवी चुकांमुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये - पृथ्वीराज पवार


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जून २०२४
कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये, किमान मानवी चुकांमुळे सांगली बुडू नये, असे जलसंपदा विभागाने नियोजन करणे गरजेचे आहे. धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे केली.

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांची पृथ्वीराज पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, धरणातील पाणीसाठा किती असावा, याविषयी नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येते. २०२१ च्या महापुरात हा तक्ता पाळला गेला नाही, असे चित्र समोर आले होते. दर पाच वर्षांनी कोयना धरणातील पाणीसाठ्याचा तक्ता ठरवला जातो. त्यानुसार पाणी नियोजन केले जाते. पण, सद्य:स्थितीचा अभ्यास करुन धरणातील पाणीसाठा आणि पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. 


कोयना धरणात कोणत्या काळात किती पाणी असावे, हा महापूर काळातील वादाचा आणि कळीचा मुद्दा ठरला होता. २०२१ ला ज्या चुका झाल्या, त्या मानवी होत्या. सगळे दिसत असताना नियोजन चुकले होते. आता पुन्हा तसे व्हायचे नसेल तर जुन्या चुका टाळाव्या लागतील. नियमात आवश्यक ते बदल करावे लागतील. त्यासाठी जलसंपदामंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हा बदल या वर्षीपासूनच अंमलात आला तर बरे होईल.

कारण, गतवर्षी दुष्काळी स्थिती होती. यंदा सरासरीहून १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत पूरप्रश्नावरील अभ्यासकांशीही चर्चा करणार आहे. यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, सचिन घेवारे, शिवाजी लोंढे आदी उपस्थित होते.