Sangli Samachar

The Janshakti News

उत्तरप्रदेशात भाजपाला रामही वाचवू शकला नाही ! कारण काय ?



| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. ५ जून २०२४
भारताच्या नकाशावरील सर्वात मोठं राज्य.. जवळपास १५ टक्के म्हणजेच ८० खासदार हे या राज्याचे असतात.. याच राज्यात अयोध्येत राम मंदिराचा मोठा सोहळा देखील झाला.. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांनीही याच राज्यातून उमेदवारी अर्ज भरलेला. या मोठ्या आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या राज्यात मात्र सकाळपासूनच मात्र भारतीय जनता पक्षाला मात्र निराशाजनक चित्र पाहावे लागले आहे. उत्तर प्रदेश मधील लोकांमध्ये भाजपविषयीची नाराजीची अनेक करणे सांगण्यात येत आहेत. भाजपविषयी नाराज असणारा मतदार हा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे वळला तर तरुणांमध्ये काँग्रेसच्या बाजूने जाणारे वातावरण देखील भाजपला मारक ठरले आहे.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमधील एकूण ८० जागांपैकी अखिलेश यादव यांच्या बहुजन समाज पक्ष ३७ जागांवर आघाडीवर आहे, भाजप ३३, काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर तर अन्य तीन जागांवर स्थानिक पक्ष आघाडीवर आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीएने यूपीमध्ये लोकसभेच्या ६४ जागा जिंकल्या आणि भाजपची संख्या एकट्या ६२ इतकी होती.


त्याच त्याच उमेदवारांना तिकीट

उत्तर प्रदेश मधील तिकीट वाटपाबाबत सी वॊटर या संस्थेचे संस्थापक यशवंत देशमुख म्हणाले, यूपीमध्ये भाजपने जुन्या लोकांना तिकीट दिले आहे. त्यांच्यातील अनेकांविषयी काहीसे नाराजीचे वातावरण तेथे आधीपासून तयार झालेले होते. तिकीट निवडीत झालेल्या चुकांमुळे भाजपला यूपीमधून अपेक्षित विजय मिळताना दिसत नाही. अनेक ठिकाणी स्थानिक राजकारणावर या निवडणुका होत असून अनेक जागांवर चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन

उत्तर प्रदेशमध्ये मागील वर्षात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा देखील चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला. केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली येथे मोठे आंदोलन झाले होते. मात्र या आंदोलनानंतर सरकारने या आंदोलनाला ज्या पद्धतीने हाताळले त्यामुळे मोठे नाराजीचे वातावरण या भागात निर्माण झाले होते. मुख्यतः यामध्ये पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा अधिक सहभाग होता.

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने ४ शेतकऱ्यांसह आठ जणांना होते चिरडले

केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष कुमार याने त्याच्या गाडीने ४ शेतकऱ्यांसह आठ जणांना चिरडल्याची घटना २०२१ मध्ये घडली होती. आधीच शेतकरी आंदोलनामुळे असलेल्या रोष होता या घटनेननंतर तो आणखी वाढलेला पाहायला मिळाला.

ब्रिजभूषणच्या मुलाला तिकीट

भारताच्या राजकारणात लैंगिक अत्याचाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या. त्यातील पहिली मणिपूर आणि दुसरी कुस्तीपटूनी भाजपच्या खासदारावर केलेले आरोप.या दोन्ही घटना देशपातळीवर महत्वाच्या ठरल्या. त्यातच भाजपने ब्रिजभूषण याला पदावरून हटवले तरी त्याच्या मुलाला तिकीट देऊन जनतेचा राग ओढवून घेतलेला दिसला. भाजपच्या विषयी नाराजी असण्याचे हे एक मोठं आणि महत्वाचं कारण ठरलं.

अग्निवीरमुळे केले होते तरुणांनी आंदोलन

उत्तर प्रदेशात बेरोजगारीचा मुद्दाही महत्वाचा ठरला त्यातच अग्निवीर योजनेचा विरोध करण्यासाठी उत्तरप्रदेश मधील तरुणाई रस्त्यावर उतरली. त्यांनी सरकारच्या या योजनेविरोधात बिहार, दिल्ली, हरियाणा और उत्तर प्रदेश या अनेक ठिकाणी आंदोलने केली. ही आंदोलने देखील सरकारने संवेदनशीलपणे न हाताळल्याचा परिणाम पाहायला मिळाला.

ज्या धर्तीवर राम मंदिर बांधलं गेलं आणि भाजपचं सर्वच राजकारण ज्या हिंदुत्व आणि रामाच्या भोवती फिरत होतं त्याच धर्तीवर भाजपाचा पराभव स्पष्ट दिसणे या दोन्ही गोष्टींनी धर्माचं राजकारण ही गोष्ट भारतीय जनता पक्षाला भोवली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.