Sangli Samachar

The Janshakti News

नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज (दि. ५) पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस त्यांनी राष्ट्रपतींकडे केली. दरम्यान, नवीन सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी ७ जून रोजी एनडीएची दिल्लीत बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. आज (दि. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक झाली. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रीमंडळाला नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली.


राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा होणार विसर्जित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा विसर्जित केली जाईल.

नव्या सरकारचा शपथविधी 8 जूनला

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर संभाव्य सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. ७ जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.