सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २६ जून २०२४
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महागाईमुळे देशातील गोरगरिबांची कुटुंबे उध्वस्त येण्याची वेळ निर्माण झाली असून याला जीएसटी कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस सह सर्वच विरोधी पक्षांनी केला होता या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच या आरोपाला प्रत्युत्तर देत, देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा लागू होऊन जवळपास सात वर्षे झाली आहेत. 1 जुलै 2017 रोजी 17 स्थानिक कर आणि शुल्क समाविष्ट करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. जीएसटी लागू झाल्यानंतर, गेल्या सात वर्षांत, गरीब आणि सामान्य लोक वापरत असलेल्या अनेक उत्पादन आणि सेवांवरील कर काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे केवळ घरगुती वस्तू स्वस्त झाल्या नाहीत तर सामान्य लोकांवरील कराचा बोजाही कमी झाला आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
आमच्यासाठी या सुधारणा 140 कोटी भारतीयांचे जीवन सुधारण्याचे साधन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. जीएसटी लागू झाल्यानंतर घरगुती वस्तू खूपच स्वस्त झाल्या आहेत. यामुळे गरीब आणि सामान्य माणसाची मोठी बचत झाली आहे. लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुधारणांचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही शाह यांनी सांगितले.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (CBIC) आकडेवारीनुसार, ताक-दही (पॅकेट केलेले नाही), मैदा, सौंदर्यप्रसाधने, टेलिव्हिजन, मोबाईल फोन आणि रेफ्रिजरेटर यासारख्या वस्तू GST लागू झाल्यानंतर लगेचच स्वस्त झाल्या. यामुळे कुटुंबांच्या उत्पन्नावरील ताण कमी झाला असून बचत वाढली आहे.