Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेच्या पराभवाने ॲड.उज्वल निकमांच्या प्रतिष्ठेला जणू धक्काच !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
जळगावचे ज्येष्ठ विधीतज्ञ विधीज्ञ ॲड. उज्वल निकम यांना भाजपने ऐनवेळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी याच अग्रलेखाच्या स्तंभात आम्ही म्हटले होते की, 'ॲड. उज्वल निकमांना गळाला लावण्यात भाजप यशस्वी ठरले'..! कारण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून ॲड. निकमांना लोकसभा निवडणूक लढवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांतर्फे ऑफर दिली होती. तथापि २०१४ आणि २०१९ ला ॲड. उज्वल निकम यांनी नम्रतापूर्वक निवडणुकी लढवणार नसल्याचे कळविले होते. त्यामुळे एकदा २०२४ च्या लोकसभेची निवडणूक ते लढवतील, असे जळगावकरांना वाटत नव्हते. परंतु पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेपूर्वी ऐनवेळी भाजप तर्फे त्यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हा जळगावकरांना आश्चर्य वाटले होते. त्याचबरोबर 'निकम यांना निवडणूक लढवायचीच होती तर जळगाव जिल्ह्यातून लढवावी' असा एक कल होता. तर उत्तर मध्य मुंबई मतदार संघ हा ॲड. निकमांसाठी नवखा असल्याने त्यांनी तिथून निवडणूक लढवायला नको होती. कारण मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा विधानसभेचा मतदार संघ असताना तसेच त्यांच्या नावाची चर्चा चालू असताना शेलार यांनी उमेदवारी नाकारली. त्या मागचे कारण शोधले तर उत्तर मध्ये मुंबईतून आपण निवडून येण्याची शक्यता नसल्याने त्यांनी उमेदवारी नाकारली, असे आता स्पष्ट म्हणता येईल.


कारण शेलार हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात असताना तसेच मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष असताना आणि २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांनी लोकसभेची उमेदवारी का नाकारली, या प्रश्नाचे उत्तर ॲड. उज्वल निकमांच्या पराभवातून मिळते, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्यामुळे सुप्रसिद्ध वकील असलेल्या ॲड. उज्वल निकम यांना उमेदवारी देऊन 'त्यांचा बळी घेतला', असे जळगाव जिल्हा वासीयांना वाटत असेल तर त्यात चुकीचे काय! तुमच्या आपसातील महायुतीच्या राजकारणातून एका स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा बळी गेला, एवढे मात्र निश्चितच. कारण उत्तर मध्य मुंबईमध्ये विधानसभा मतदारसंघ असलेल्या क्षेत्रातून अगदी काठावर मताधिक्य ॲड. उज्वल निकम यांना मिळाले आहे. तसेच इतर भाजपच्या तीन विधानसभा मतदारसंघातून ॲड. उज्वल निकम यांना प्रतिस्पर्धी उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यापेक्षा कमी मतदान झाले हे विशेष…

ॲड. उज्वल निकम मतमोजणीच्या दिवशी अगदी सुरुवातीपासून शेवटच्या पाच फेऱ्या शिल्लक असताना आघाडीवर होते. त्यांची सुरुवातीपासूनची मतांची आघाडी पाहून जळगावकर तसेच ॲड. उज्वल निकम यांचा चाहता वर्ग कमालीचा आनंदी व खुशीत होता. परंतु शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये ॲड. निकम यांची आघाडी घटून ते पिछाडीवर गेले आणि 'अवघ्या तीन हजार मतांनी पराभूत' झाले. मताधिक्य कितीही असले तरी शेवटी पराभव तो पराभवच.. उत्तर मध्ये मुंबईमध्ये ॲड. उज्वल निकमांना जे काही मतदान झाले त्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना श्रेय देता येणार नाही. हे सर्व मतदान ॲड. उज्वल निकम यांच्या व्यक्तिमत्त्वाला मिळाले आहे, असे प्रथमदर्शनी जळगावकरांना तसेच त्यांच्या चाहत्यांना वाटते.

शेवटपर्यंत मतांची आघाडी असलेल्या निकमांची लीड आता तुटणे शक्य नाही, असे वाटत होते. विजयाची जय्यत तयारी त्यांच्या चाहत्यांकडून करण्यात आली होती. परंतु शेवटच्या दोन-तीन फेऱ्यांमध्ये चित्र पलटले आणि निराशा पदरी पडली. ॲड. निकम विजयी झाले असते तर जळगावच्या सुपुत्राने मुंबईतील मतदार संघात जाऊन आपले नाव रोशन केले म्हणून त्यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा चढला असता. कारण विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीत अपयश नव्हतेच. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने त्यांच्या प्रतिष्ठेला जणू धक्का बसला आहे. निवडणुकीत हार जीत होत असते हे जरी खरे असले, तरी यशाचे शिखर पदाकांत करणाऱ्याला अपयश आले तर ते सहज पचनी पडत नाही. ॲड. उज्वल निकमांनी निवडणूक लढवली नसती तर त्यांची एक वकील म्हणून क्लीन इमेज राहिली असती. महायुती अर्थात भाजपने ॲड. उज्वल निकम यांना उमेदवारी देऊन बाजी मारली हे खरे असले, तरी त्यांच्या प्रचारात महायुती कार्यकर्त्यांकडून जी मेहनत घ्यायला हवी होती ती घेतली गेली नाही, हे खेदाने म्हणावे लागेल. आता भाजपची ॲड. उज्वल निकमांच्या संदर्भात जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या पराभवाची भरपाई भाजपने करणे गरजेचे आहे. त्यासाठी उज्वल निकमांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवले पाहिजे, तरच त्यांच्या ज्ञानाचा संसदेत उपयोग होईल !