Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभा निवडणूक पार पडताच टोल व दुधाच्या किंमतीत वाढ !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३ जून २०२४
देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. शनिवारी (१ जून) निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. तसेच निवडणुकीच्या निकालासंदर्भातील एक्झिट पोलदेखील जाहीर झाले आहेत. उद्या (४ जून) या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. दरम्यान, निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमुल दुधाच्या किंमतीत प्रती लीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून (सोमवार, ३ जून) लागू झाल्या आहेत. जीसीएमएमएफने केलेल्या घोषणेनुसार अमुल दूध दोन रुपयांनी महागलं आहे. यामध्ये ‘अमुल गोल्ड’, ‘अमुल ताजा’, ‘अमुल शक्ती’चा समावेश आहे. ‘अमुल ताजा’ची सर्वात लहान पिशवी (पाव लीटर) वगळता इतर सर्व प्रकारच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

अमुलने जाहीर केलेल्या नव्या किंमतींनुसार ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पाऊचसाठी (पिशवी) आता ३२ ऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना अमुल गोल्डच्या एक लीटर पाऊचसाठी आता ६४ ऐवजी ६६ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ‘अमुल ताजा’साठी (अर्धा लीटर) २६ ऐवजी २८ रुपये, ‘अमुल शक्ती’साठी (अर्धा लीटर) २९ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. दुधाच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.


दरम्यान दरवर्षीप्रमाणेच यंदाही टोल दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आज मध्यरात्रीपासून देशभरातील सर्वच टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार आहे. एप्रिलमध्ये ही वाढ करण्यात येणार होती परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. 

रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली जाणार आहे. यानुसार प्रत्येक टोलमागे ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. देशभरात जवळपास ११०० टोलनाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर ही वाढ केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यामुळे टोलच्या दरात संशोधन करण्यात आल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

या टोल दर वाढीचा लाभ आयआरबी आणि अशोक बिल्डकॉन या कंपन्यांना होणार आहे. भारतात जवळपास 146,000 किमी लांबीचे महामार्ग आहेत. यामध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 2018/19 मधील 252 अब्ज रुपयांवरून 2022/23 आर्थिक वर्षात टोल संकलन 540 अब्ज रुपये ($6.5 अब्ज) पेक्षा जास्त झाले आहे. रस्ते वाहतूक, वाहने वाढल्याने तसेच टोलमध्ये वाढ केल्याने संकलनात एवढी मोठी वाढ झाली आहे.