Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतला 'विशाल' विजय काँग्रेसचा, विश्वजित कदमांनी स्पष्टच सांगितले !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जून २०२४
अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले आहे. भाजपापेक्षाही चार जागा जास्त मिळवत काँग्रेस राज्यातला मोठा पक्ष बनला आहे. पण या सर्व विजयात सध्या चर्चा सुरू आहे ती सांगली लोकसभेची. कारण या लोकसभेत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने लोकसभेच्या रिंगणात उतरवलेल्या चंद्रहार पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. पण काँग्रेसने उमेदवारी न दिलेल्या विशाल पाटलांनी या लोकसभेत विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांच्या या विजयाबाबत आता काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशाल पाटील हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहे. ते काँग्रेसचे खासदार आहेत असे विधान आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे.

सांगली लोकसभेतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाबाबत बोलताना आमदार विश्वजित कदम म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील जनतेसमोर काय घडले ते मी मांडले आहे. व्यक्तिगत मला खूप त्रास झाला. वेगळ्या स्तरावर माझ्या पक्षश्रेष्ठीसमोर गैरसमज होतील असा संदेश पाठवला गेला. काँग्रेसला आणि पंजाला उमेदवारी मिळू नये, यासाठी काहींनी कट केले. या सर्वांवर मात करून आता आम्ही पुढे भविष्यात काम करणार आहे. मला अजून खूप मांडायचे आहे ते योग्य वेळी मांडेन.


तसेच, माझ्यावर कुठलेही दडपण नाही. पलूस कडेगावची लोक माझ्या पाठीशी आहेत. ज्या विमानात आम्ही बसलो, त्या विमानाचे मॅन्युफॅक्चरिंग हे पतंगराव कदम, वसंतदादा पाटील यांच्या विचारांचे आहे. हा विचार इतका मजबूत आहे त्याला कुणी धक्का लावू शकत नाही. विशाल पाटील हे महाविकास आघाडी घटक खासदार आहेत. आमचे काँग्रेसचे 14 खासदार महाराष्ट्रात आलेत. देशात 100 वी जागा विशाल पाटलांची आहे असे विश्वजित कदमांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील जनतेने 31 खासदार मविआचे निवडून दिले. हा कौल राहुल गांधीच्या नेतृत्वाला आहे. जे फोडाफोडीचे, दबावाचे राजकारण करत आहेत, त्याला लोक कंटाळले. उद्धव ठाकरे, शरद पवारांचे पक्ष फोडले. त्यांना जो त्रास झाला हे महाराष्ट्रातील लोकांना मान्य झालेला नाही. 48 पैकी 31 जागा आल्या आहेत. उत्तर प्रदेशात राम मंदिराचे उद्घाटन केले. भाजपाच्या नेत्यांमध्ये जो अहंकार आला होता. त्या राज्यात 37 खासदार समाजवादी पार्टीचे आले आहेत, असा टोला त्यांनी विश्वजित कदमांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

तर, सांगलीची जागा मिळावी यासाठी मी प्रयत्न केले. तरूण खासदाराला दुर्दैवाने उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांना राज्यसभेची ऑफर होती. त्यांना आम्ही वाऱ्यावर कधीच सोडले नाही. विशाल पाटील यांना लोकांचे प्रश्न माहिती आहे. विमानतळाचा विषय आहे. पाणी प्रश्न आहे. लोकसभेत ते आवाज उठवतील. आम्ही ताकदीने प्रश्न मार्गी लावू. सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस विचारांचा आहे, असेही आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले.