Sangli Samachar

The Janshakti News

भाजपा पाच राज्यात भाकरी फिरवणार| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ जून २०२४
लोकसभा निवडणुका झाल्या, भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. एनडीए बहुमत मिळाले. दरम्यान, आता भाजपाचे बैठकीचे सत्र सुरू आहे. भाजपा अनेक राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे. भाजपा गुजरात, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करणार आहे, कारण या राज्यांच्या विद्यमान प्रदेशाध्यक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

याशिवाय तामिळनाडू आणि राजस्थानच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बदलाची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात पक्षाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचीही नव्याने निवड करावी लागणार आहे कारण विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डाही केंद्रीय मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यांचा कार्यकाळही ३० जून रोजी संपत आहे. यामुळे आता भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीनंतरच या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचीही नियुक्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.


गुजरातमध्येही प्रदेशाध्यक्षपद बदलणार

गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि चार वेळा खासदार सीआर पाटील यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मात्र, गुजरात भाजप अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ काही महिन्यांपूर्वीच संपला. लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना या पदावर राहण्यास सांगण्यात आले होते. आता ते केंद्र सरकारमध्ये सामील असल्यामुळे त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होणार हे निश्चित आहे.

दुसरीकडे, तेलंगणा प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी यांचा पुन्हा केंद्रीय परिषदेत समावेश करण्यात आला आहे. आता त्यांच्या जागी दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याचा शोध सुरू आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी पक्षात दाखल झालेले खासदार एटाळा राजेंद्र यांना तेलंगणा भाजपचे नवे अध्यक्ष केले जाऊ शकते, असे मानले जात आहे. राज्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे.

मात्र, राजस्थानमध्ये भाजपने लोकसभेच्या 25 पैकी केवळ 14 जागांवर विजय मिळवल्यामुळे संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याची योजना आखली जात आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानमधील सर्व 25 जागांवर क्लीन स्वीप केला होता. पक्षाच्या खराब कामगिरीनंतर आता खासदार असलेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनाही बदलण्याची शक्यता बळावली आहे.