Sangli Samachar

The Janshakti News

ब्रेकिंग न्यूज मधून देश चालणार नाही, मंत्र्यांची नावे ठरणार नाहीत; मोदींच्या माध्यमांना कानपिचक्या !सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
ब्रेकिंग न्यूज मधून देश चालणार नाही मंत्र्यांची नावेही ठरणार नाहीत अशा स्पष्ट शब्दांमध्ये नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधून माध्यमांना कांतीच्या दिल्या तरी देखील माध्यमांच्या मंत्र्यांची नावे ठरवण्याच्या अटकळी जशाच्या तशाच सुरू राहिल्या. इतकेच काय पण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या गोटातल्या घडामोडींच्या बातम्या माध्यमे लटकत्या सूत्रांच्या हवाल्याने देत राहिली.


सध्या माध्यमांमध्ये जोरदार हवाबाजी सुरू आहे. वाटेल ते लोक मंत्र्यांची यादी तयार करायला लागले आहेत, पण कुणी - कुणी तर माझ्या सहीची यादी सोशल मीडियात फिरवायला लागले आहेत पण असल्या ब्रेकिंग न्यूज मधून देश चालणार नाही. ज्यांना मोदी माहिती आहे, ते नसत्या ब्रेकिंग न्यूज चालवणार नाहीत आणि कुणीही चालवल्या, तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण ब्रेकिंग न्यूज मधून मंत्रिमंडळाची यादी ठरत नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये नरेंद्र मोदींनी माध्यमांना फटकारले. मोदींचा हा फटकारा खाऊन माध्यमे सुधारली नाहीत. त्यांनी लटकत्या सूत्रांच्या आधारे मंत्र्यांची नावे जाहीर करणे सुरूच ठेवले. एनडीएचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला माध्यमांनी परस्परच ठरवला.

त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बातम्यांची पतंगबाजी केली. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री कोण होणार?, उपमुख्यमंत्रीपदी गिरीश महाजन येणार की शंभूराज देसाई येणार ?, असल्या बातम्या लटकत्या सूत्रांच्या हवाल्याने चालविल्या. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस दिवसभरात अमित शहांना भेटले ते एनडीएच्या बैठकीत सामील झाले. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरच्या बैठकीत सामील झाले. ते माध्यमांशी काही बोलले नाहीत, तरी देखील माध्यमांची फडणवीस यांच्या राजीनाम्याविषयी बातम्यांची पतंगबाजी सुरूच राहिली. फडणवीसांचा राजीनामा अमित शाहांनी नाकारला. त्यांना वाट पाहायला लावली, वगैरे बातम्यांचे पतंग माध्यमांनी दिल्लीच्या हवेत उडविले. प्रत्यक्षात यातली एकही बातमी खरी ठरली नाही.