Sangli Samachar

The Janshakti News

फडणवीसांच्या विनंतीला मान, मनसेची दोन पावलं माघार| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राजकीय पक्षांना विधान परिषद निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र मनसेनं या निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सरदेसाई ? 

'उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वत: येऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीत अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे हेच उमेदवार असतील' असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान अभिजित पानसे यांच्या माघारीमुळे आता निरंजन डावखरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणिसांची शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सुधारीत निवडणूक कार्यक्रामानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 31 मे पासून सुरुवात झाली आहे, शेवटची तारीख 7 जून असणार आहे. 10 जून रोजी अर्जाची छाननी होईल, बारा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर 26 जूनला मतदान होणार असून, एक जुलै रोजी निकाल लागणार आहे.