Sangli Samachar

The Janshakti News

सावधान ! सायबर गुन्हेगार आता करत आहेत पेन्शनधारकांना लक्ष्य, लेखा व कोषागारे संचालनालयाचे सावधानतेचे आवाहन !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जून २०२४
ऑनलाइन गंडा घालणारे भामटय़ांनी नोकरदार, व्यापारी, दुकानदार, गृहिणींबरोबरच आता निवृत्तीवेतनधारकांनाही लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज्याच्या लेखा आणि कोषागार संचालनालयाने अनोळखी फोन, एसएमएसला प्रतिसाद देऊ नये. आम्ही फक्त पत्रव्यवहाराद्वारेच संपर्क करतो. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या लेखा व कोषागारे संचालनालयाने केले आहे.

राज्याचे अधिदान व लेखा कार्यालयातून मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतनविषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात, मात्र हे लाभ देताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत, दिलेल्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत पह्न करून संपर्क साधला जात नाही तसेच ऑनलाइन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. कार्यालयांमार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. त्यामुळे अशा येणाऱया संदेशाबाबत सावध राहून कुणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


…तर कार्यालयाला कळवावे !

अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयास कळवावे, कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी केले आहे.

अशी करतात फसवणूक

– काही निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाइन रक्कम भरल्यानंतर कोषागारांतील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
– दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून थकीत रक्कम मिळणार असल्याचा संपर्क साधून रक्कम ऑनलाइन, गुगल पे, पह्न पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत सांगितले जात आहे.