Sangli Samachar

The Janshakti News

राम मंदिर, मोफत धान्य आणि गॅरंटी का आले नाही भाजपच्या कामी? अपयशाची 5 मोठी कारणं !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
यंदाच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचं दिसतं आहे. यंदा एकहाती बहुमताचा आकडा गाठण्यापासून भाजप खूप लांब असल्याचं दिसतं आहे. पण एनडीएच्या 295 जागांनी मात्र बहुमताचा आकडा पार केलेला आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने यंदा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केल्याचं दिसतं आहे. ही आघाडी सध्या 231 जागांवर अग्रेसर आहे. एकट्या काँग्रेसने 100+ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, समाजवादी पक्ष 35 जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेस 29 जागांवर पुढे असून डीएमकेचे उमेदवार 22 जागांवर पुढे आहेत.

अखेर 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला अशा प्रकारचा धक्का का बसला असेल? कशामुळे 2014 आणि 2019 पेक्षाही यंदा त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत? राम मंदिर, मोफत शिधा आणि `मोदी की गॅरंटी` या सारख्या भाजपाच्या मुद्द्यांवर जनतेनं विश्वास ठेवला नाही का? काय आहेत, भाजपच्या अपयशाची कारणं...


1. तिकीट वाटप

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिकीट वाटपातूनच भाजपाला यंदा मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. 2019 मध्ये विजयी झालेल्या 100 पेक्षा अधिक खासदारांना भाजपानं यावेळी उमेदवारी नाकारली होती. बहुतांश जागांवर नवीन चेहरे दिले होते. यातही बरेचसे असे नेते होते, जे अन्य पक्ष सोडून भाजपामध्ये आले होते. ज्यांना भाजपाचं राजकारण जवळून माहिती आहे, ते सांगतात की निवडणुकीत याचा फटका पक्षाला सहन करावा लागला आहे.

2. महागाई - बेरोजगारी

`मोदी की गॅरंटी` यासारखी आश्वासनं आणि मोफत धान्य यासारख्या योजना जाहीर करून सुद्धा महागाई आणि बेरोजगारी हे या निवडणुकीमध्ये मोठे चर्चेतले मुद्दे ठरले. अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केलं होतं. निवडणुकीतही यावर खूप चर्चा झाली. पेपरफुटी प्रकरण, नोकऱ्या जाण्याचा प्रश्न उचलून धरला गेला पण भाजपानं याकडे दुर्लक्ष केलं.

3. खासदारांची नाराजी

भाजपाच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या एका तज्ज्ञानं न्यूज 18 ला सांगितलं की, बहुतांश हिंदी भाषिक राज्यांमध्ये जनता पक्षाच्या खासदारांवर नाराज होती. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये बहुतांश खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये फिरकलेच नाहियेत. एकादृष्टीनं ते जनतेपासून दूरच गेले होते. 2014 आणि 2019 मध्ये तर या खासदारांना मोदींना पाहून मत दिलं गेलं होतं, पण यावेळी लोकांनी आपला विचार बदलला.

4. मुस्लिम आरक्षण

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपने खूप आक्रमक पद्धतीने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सगळ्या रॅलींमधून विरोधी पक्षांवर आरक्षणाच्या राजकारणाचा आरोप केला होता. पण हा मुद्दा भाजपावरच उलटला आहे, असं चित्र आता दिसतं आहे. मुस्लिमबहुल जागांवर विरोधकांना एकगठ्ठा मतं मिळाली आहेत.

5. सीएए-एनआरसी आणि यूसीसी

CAA-एनआरसी आणि यूसीसी या मुद्द्यांवरून भाजपची कोंडी झाली. विरोधी पक्षांनी याच मुद्द्यांवर मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला दिसतो आहे. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये, जिथं भाजपने 2019 मध्ये 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या, तिथं यंदा जागांची संख्या कमी होऊन त्या अर्ध्यावर आल्या आहेत. तर, ममता बॅनर्जी यांच्या जागा 22 वरून वाढून तो आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे.