Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिह्यात दमदार पाऊस, सरासरी 34 मिमी पावसाची नोंद; येरळा, अग्रणी नदीला शिराळा भागात पूरस्थिती !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० जून २०२४
सांगली जिह्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सलग दुसऱया दिवशी शनिवारी रात्रभर दमदार पावसाने हजेरी लावली. रविवारी दिवसभर सुसाट वारे वाहत होते; परंतु दिवसा पूर्ण उघडीप दिली. रात्रभर पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीच पाणी झाले. जिह्यात सरासरी 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपात्रातही काहीशी वाढ झाली. तासगाव तालुक्यात येरळा, अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाली. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, दमदार पावसाने खरिपाच्या मशागतींना ब्रेक मिळाल्याचे चित्र होते.

मागील तीन दिवसांपासून मान्सून कोकणात दाखल झाला होता. पोषक वातावरण तयार असल्याने शनिवारी रात्री जिह्यात जोरदार पावसाने मजल मारली. पावसाचा जोर मोठा असल्याने काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. जिह्यात बहुतांशी तालुक्यात पावसाची संततधार सुरू राहिली. आटपाडी, वाळवा, मिरज, शिराळा, कडेगाव, खानापूर तालुक्यांत चांगला पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि वीज चमकण्याच्या प्रकारामुळे महावितरणकडून रात्री ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.


तासगाव तालुक्यातील मुसळधार पावसाने येरळा आणि अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाली. टंचाईचा सामना करणाऱया जत तालुक्यातील पूर्व भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, नाले ओसंडून वाहू लागले. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांसह लहान रस्ते पाण्याखाली गेले होते. दुष्काळी भागात एकसारखा पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. रब्बी हंगाम वाया गेला होता. यंदा वेळेत पावसाला सुरुवात झाल्याने खरिपाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

सांगलीत पाणीच पाणी

सांगली, मिरज शहरांना जोरदार पावसाने झोडपून काढले. संततधार पावसाने शहरातील बहुतांशी भागात पाणीच पाणी झाले. शहरातील गुंठेवारी भागात पाणी साचून राहिल्याने दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना रहदारी करताना कसरत करावी लागत असल्याचे चित्र होते.

जिह्यात 34 मि.मी. पावसाची नोंद

जिह्यात गेल्या चोवीस तासांत 34 मि.मी. पावसाची नोंद झाली. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 67.3 मि.मी. पाऊस झाला. याशिवाय मिरज तालुक्यात 31.9 मि.मी., जत 1, खानापूर 29.9, वाळवा 48.8, तासगाव 23.6, शिराळा 58.2, कवठे महांकाळ 32.5, पलूस 7.5 आणि कडेगाव तालुक्यात 54.6 मिलिमीटर पाऊस झाला.