Sangli Samachar

The Janshakti News

अखेर 'आप'ची कबुली; स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या PA वर होणार कारवाई !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १५ मे २०२४
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचे पक्षाने मान्य केले आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवास्थानी घडलेल्या या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. केजरीवालांच्या खासगी सचिवाने मारहाण केल्याचा फोन दिल्ली पोलिसांना करण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, केजरीवालांकडून पीएवर कारवाई केली जाणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

दिल्ली पोलिसांकडून सोमवारी स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याचा कंट्रोल रूममध्ये कॉल आला होता, अशी माहिती देण्यात आली होती. केजरीवालांचे पीए विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केली असल्याचे मालीवाल यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर मालीवाल पोलिसांतही गेल्या होत्या. त्यांनी लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.


मालीवाल यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारावर मालीवाल यांच्यासह आप तसेच केजरीवालांकडूनही मंगळवारी दुपारपर्यंत काहीही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. अखेर पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी याबाबत कबुली दिली आहे.

मीडियाशी बोलताना संजय सिंह म्हणाले, काल एक निंदनीय घटना घडली. स्वाती मालीवाल या केजरीवालांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या एका खोलीमध्ये त्यांची वाट पाहत बसल्या होत्या. यावेळी विभव कुमार यांनी त्यांच्या कथित गैरवर्तन केले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून योग्य कारवाई केली जाईल. स्वाती मालीवाल यांचे देश आणि समाजासाठी मोठे काम आहे. त्या पक्षाच्या जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, असेही संजय सिंह म्हणाले. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपने आपसह केजरीवालांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान, मालीवाल यांच्याकडून अद्याप केजरीवालांच्या पीएविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत नेमके काय घडलं, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना मारहाण झाली की गैरवर्तन करण्यात आले, याबाबत संभ्रम वाढला आहे. दिल्ली महापालिकेमध्येही मंगळवारी मालीवाल प्रकरण गाजले. महापालिकेची बैठक सुरू झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी मालीवाल यांचा मुद्दा उपस्थित करून केजरीवालांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे महापौरांना बैठक स्थगित करावी लागली. पक्षाच्या महिला खासदारांचे संरक्षण मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ते राज्यातील महिलांचे संरक्षण कसे करणार, अशी टीका नगरसेवकांकडून करण्यात आली.