Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन मतदारांमध्ये शंका-कुशंका



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२४
शहरातील काही मतदान केंद्रांवर बीप आवाजावरुन शंका-कुशंका उपस्थित झाल्या. बदण दाबल्यानंतर जेव्हा लाल दिवा लागतो तेव्हा मतदान झाल्याचे मानले जाते. त्यानंतर लगेचच बीपचा आवाज ऐकायला मिळतो. मात्र सांगलीतील काही केंद्रांवर बीपचा आवाज उशिरा येत असल्याने मतदार गोंधळून गेले.

सांगलीच्या शांतिनिकेतन येथील केंद्रातील खोली क्रमांक ४ मधील यंत्रांबाबत हाच गोंधळ होता. रांगेत थांबलेल्या लोकांना बीपचा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मतदान करतेवेळी ते कर्मचाऱ्यांसमोर शंका उपस्थित करीत होते. काहींनी बटण दीर्घकाळ दाबून धरण्याचा प्रयोग केला. यंत्राच्या बीपचा आवाज उशिराने येतो, असे सांगून कर्मचारी दमले. मतदान झाल्यानंतर मतदार दरवाजातून बाहेर पडत असताना अत्यंंत मंदपणे बीपचा आवाज येत होता.

एका मतदाराने याबाबतचे कारण कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांना उत्तर काय द्यायचे, असा प्रश्न पडला. व्हीव्हीपॅट मशिनवर स्लीप पाहून झाल्यानंतरही काही वेळाने बीपचा आवाज येत होता. त्यामुळे मतदान झाले की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.

काही मतदारांनी शंका उपस्थित केल्यानंतर कर्मचारी त्यांना दिलासा देत होते. 'मतदान यंत्र ठीक आहे. त्यात कोणताही दोष नाही. बीपचा आवाज कधी आला, यापेक्षा व्हीव्हीपॅटवरील स्लीप पहा आणि निश्चिंत रहा', असे सांगितले.