| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे मेहुणेही त्यांच्यापेक्षा काही कमी नाहीत. गुरुराज देशपांडे असं त्याचं नाव आहे. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची बहीण जयश्री यांचे ते पती आहेत. गुरुराज देशपांडे हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ते अत्यंत जवळचे होते. २०१० मध्ये ते ओबामा यांच्या टीमचा भाग होते. दिग्गज देणगीदारांमध्येही त्यांची गणना होते. त्यांनी २०८ कोटींहून अधिक देणगी दिली आहे. गुरुराज देशपांडे हे मद्रास आयआयटीमधून पदवीधर आहेत.
गुरुराज देशपांडे यांचा जन्म कर्नाटकातील हुबळी येथे झाला. पदवीपर्यंत ते भारतातच राहिले. त्यांचे वडील भारत सरकारमध्ये कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते. देशपांडे यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) पदवी घेतली आहे.
यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गुरुराज देशपांडे हे कॅनडाला गेले. सध्या गुरुराज देशपांडे हे A123सिस्टम्स, सिकामोर नेटवर्क्स, तेजस नेटवर्क्स, हाइवफायर, सँडस्टोन कॅपिल आणि स्पार्टा ग्रुपचे चेअरमन आहेत. याशिवाय ते एरवानामध्ये बोर्ड सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
गुरुराज देशपांडे यांनी प्रामुख्यानं शैक्षणिक संस्थांच्या मदतीनं देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनच्या स्थापनेसाठी देणगी दिली आहे. अनेक कंपन्यांचे मालक असलेल्या देशपांडे यांनी गेल्या काही दशकांत वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून विकल्या आहेत. १९९३ मध्ये त्यांनी कोरल नेटवर्क्स ही आपली सुरुवातीची कंपनी १.५ कोटी डॉलर्सना विकली. १९९७ मध्ये त्यांनी कॅस्केड कम्युनिकेशन्स ३.७ अब्ज डॉलरला विकली. त्याची स्थापना त्यांनीच केली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जुलै २०१० मध्ये गुरुराज देशपांडे यांची नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिल ऑन इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिपच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती केली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची इनोव्हेशन स्ट्रॅटेजी अंमलात आणण्यासाठी या टीमची स्थापना करण्यात आली होती. देशपांडे यांचा विवाह सुधा मूर्ती यांची बहीण जयश्री यांच्याशी झाला आहे. एमआयटीच्या देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनच्या त्या सहसंस्थापक आहेत