Sangli Samachar

The Janshakti News

Hang On Cafe चालकास अटक; 'पोक्सों'तर्गत पोलिसांची कारवाई !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२४
शंभर फुटी रस्‍त्यावरील 'हँग ऑन कॅफे'त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. कॅफेतील कंपार्टमेंटमध्ये संशयितास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी कॅफे चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिकेत प्रताप घाडगे (अशोक स्फूर्ती बंगला, रामकृष्ण परमहंस सोसायटी, शंभर फुटी रस्ता, सांगली) असे संशयित कॅफे चालकाचे नाव आहे. 

'पोक्सो'च्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कॅफेतील गैरप्रकारासंदर्भात तपसाणीचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शंभर फुटी रस्त्यावरील 'हँग ऑन कॅफे'मध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शंभरफुटी रस्त्यावरील 'हॅंग ऑन कॅफे'वर हल्लाबोल केला. 


सर्व केबिन, फर्निचर व साहित्याची तोडफोड केली. विश्रामबाग पोलिस घटनास्थळी येऊन पाहणी करत असतानाच कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौक गाठला. खरे मंगल कार्यालयाजवळील इमारतीतील 'डेनिस्को' आणि 'कॅफे सनशाईन' या कॅफे शॉपची देखील त्यांनी तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी ज्या कॅफेत अत्याचाराची घटना घडली, त्या 'हँग ऑन कॅफे'चा चालक अनिकेत घाडगे यास या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. 

अपराध करणे सोयीचे व्हावे, यासाठी कॅफेमध्ये बसलेले ग्राहक एकमेकांना दिसू नयेत, याकरिता पडदे लावले होते, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम, आडोसा केल्यास कारवाई करण्यात येत आहे. गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

१६ जणांची मुक्तता

दरम्यान, तोडफोड प्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.

कॅफे चालकाला वाचवण्यास नेते

ज्या कॅफेत बलात्काराची घटना घडली, त्यात चालकाला 'पोक्सों'तर्गत अटक केली. त्याने कॅफेत कंपर्टमेंट केल्याचे समोर आल्यानंतर कारवाई केली. कॅफे चालकाला वाचवण्यासाठी माजी महापौर, युवा नेते पोलिस ठाण्यात आले होते. अशा संवेदनशील गुन्ह्यात तरी संबंधितांनी गांभीर्य दाखवायला हवे होते. मात्र, सांगलीसाठी लांच्छनास्पद आहे.