Sangli Samachar

The Janshakti News

निवडणूक संपताच अजित पवारांना दणका, ईडीने नाव वगळलेल्या 'त्या' घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ मे २०२४
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील मतदान संपले आहे. हे मतदान संपते ना संपते तेच अजित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू केली गेली आहे. राज्याच्या ⁠लाचलुचपत विभाग अर्थात एसीबीकडून ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समजली आहे. साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात आता ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. ही चौकशी पुन्हा सुरु होणे म्हणजे अजित पवारांसाठी हा धक्का मानला जातोय.

जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु होणे म्हणजे महायुतीत सर्व आलबेल नाही अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत. अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले होते.

जरंडेश्वर कारखान्याची ईडीने चौकशी केल्यानंतर चार्जशीट दाखल केले. यामधून त्यातून अजित पवार यांचे नाव वगळले होते. परंतु आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केली असल्याने मोठा धक्का पवार यांना बसल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण.. 
जरंडेश्वर साखर कारखाना तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील चालवत होते. त्यावेळी कर्जात बुडालेला हा कारखाना वाचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. यात त्यांना यश आले नाही. अखेर हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गेला त्याचाच लिलाव झाला व हा कारखाना गुरु कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतला. 

अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याचा आरोप केला जातोय. शालिनीताई पाटील यांनी ही लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप केला आहे.