Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेला भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली राजू शेट्टींना मदत, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप !| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. २२ मे २०२४
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदार संघात पक्षादेश डावलून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विरोधी उमेदवार राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप करत महायुतीमधील सर्व पक्षांच्या नेत्यांनी निशिकांत पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. आनंदराव पवार, राहुल महाडिक यांनी थेट नाव घेत हल्ला चढवला तर विक्रम पाटील यांनी नाव न घेता निशिकांत पाटील यांच्यावर आरोप केले. येथील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आयाेजित पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यावेळी भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट, मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विक्रम पाटील म्हणाले, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभा घेतल्या. पंतप्रधानांनी 'चारशे पार'चा नारा दिला आहे. मात्र, त्यांच्या या प्रयत्नालाच प्रतिआव्हान देत पक्षात पाहुणे म्हणून आलेल्या सर्व पदांचा लाभ उठवणाऱ्या नेत्याने धैर्यशील माने यांच्या विरोधात काम केले. 


आम्ही महायुतीच्या घटक पक्षातून नेत्यांकडे सामुदायिक तक्रार करणार आहोत. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार म्हणाले, निशिकांत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांचा प्रचार सुरू केला होता. याची माहिती मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना दिली होती तरीसुद्धा पाटील यांचे कार्यकर्ते युतीच्या उमेदवाराविरुद्ध काम करत होते. २०१९ च्या विधानसभेतही त्यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्याभोवती सल्लागार असलेल्या बच्चे कंपनीच्या सल्ल्यावरून धैर्यशील माने यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे निशिकांत पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी.

जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक म्हणाले, २०१६ साली वनश्री नानासाहेब महाडिक, सदाभाऊ खोत यांनी विकास आघाडीत विक्रम पाटील, आनंदराव पवार हे जेष्ठ असतानाही निशिकांत पाटील यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. ८ दिवसांत त्यांनी वेगळी चूल मांडत नगरसेवकांना धमकावण्यास सुरूवात केली. विधानसभेवेळी बंडखोरी केली. जॅकेट घालून आमदार होता येत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर राजू शेट्टी यांचे काम केले. त्यामुळे निशिकांत पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी.