Sangli Samachar

The Janshakti News

उध्दव ठाकरेंना भेटण्यासाठी विश्वजित कदम थेट कोल्हापुरात ! सांगली बद्दल काय सांगितलं ?



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २ मे २०२४
महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वीच पक्षांमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेची तयारी करणाऱ्या विशाल पाटील यांना तगडा झटका बसला. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघारी न घेता सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबतचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला असून नाही त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम सांगलीतून कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले


विश्वजित कदमांचा सांगलीवर बोलण्यास स्पष्ट नकार

या भेटीमध्ये काय चर्चा झाली असे विचारण्यात आले असता आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की कोल्हापूर मतदारसंघाच्या अनुषंगाने आमची चर्चा झाली. सांगली लोकसभेबाबत कोणताही चर्चा झाली नाही. विश्वजित कदम यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. कोल्हापूरमध्ये आमच्या संस्था आहेत आणि व्यक्तिगतरित्या शाहू महाराज कुटुंबाबद्दल कदम कुटुंबाला आदर आहे. त्यामुळे त्यामुळे कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूर मधील जी आमची भूमिका आहे त्या संदर्भातील चर्चा केल्याचे ते म्हणाले.

दरम्यान सांगलीत बंडखोरी करण्याबाबत राज्यातील एका वरिष्ठ नेत्याचा दबाव असल्याची माहिती डॉ. विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिली असल्याचे समजते. तसेच जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारी विरोधात भूमिका घेत असल्याबद्दल कदम यांनी खंत व्यक्त केल्याची ही माहिती एका वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.