Sangli Samachar

The Janshakti News

पुण्यात सुरू झालंय मधमाशांसाठी हॉटेल !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २३ मे २०२४
आपण नेहमीच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला जातो. पण तुम्हाला जर असे सांगितले की आता मधमाशा सुद्धा हॉटेलमध्ये जातात, तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. आणि ते शक्य करून दाखविले आहे 'हनी बी मॅन' म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र जानी यांनी मधमाशीचे हे हॉटेल सुरू झाले आहे पुण्यामध्ये आणि याचे नाव आहे 'हनी बी हॉटेल' या हॉटेलमध्ये विविध प्रकारची चव मधमाशांना चाखायला मिळणार आहे. हा उपक्रम मधमाशांच्या संवर्धनासाठी देवेंद्र जानी यांनी राबविला आहे. जैवविविधतेमध्ये सर्वाधिक वाटा मधमाशांचा आहे त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे असे देवेंद्र जानी यांना वाटते.

संयुक्त राष्ट्रसंघाने 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर 22 मे हा जागतिक जैवविविधता दिन असतो, त्यामुळे या दोन्ही दिनाच्या निमित्ताने या उपक्रम खरच कौतुकास्पद आहे. यंदाची थीम 'बी एंगेज्ड विथ यूथ' अशी आहे. शहरातील मधमाशांचे संवर्धन करणारे देवेंद्र जानी यांनी स्थानिक मधमाश्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखी कल्पना मांडली आहे. त्यांनी सर्वांत उंच बी हॉटेलची रचना केली आहे.

मधमाश्यांचे हॉटेल हे मधमाश्यांसाठी एक प्रकारचे कीटक असणारे हॉटेल आहे, जे मधमाश्यांना विश्रांती आणि निवारा देते. मधमाश्यांची घरे उंच झाडांवर, मृत लाकडाच्या ओंडक्यावर किंवा इतर नैसर्गिक ठिकाणांवर असतात. त्यांची घरे नाहीशी होत असल्याने खास कृत्रिम, पण नैसर्गिक असे हे हॉटेल त्यांच्यासाठी वरदान ठरणारे आहे.

मधमाशांवर उत्पादन अवलंबून

एकाकी मधमाशांमध्ये लीफकटर बी, कारपेंटर बी, मेसन बी, कोकीळ मधमाशी आणि ब्लू बँन्डेड बी यांचा समावेश होतो जगाचा एक तृतीयांश अन्न पुरवठा मधमाशांवर अवलंबून आहे. कारण त्या परागीभवन करतात. मधमाशांशिवाय, अन्नाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू शकते. म्हणून त्यांचे संवर्धन गरजेचे आहे, असे देवेंद्र जानी यांनी सांगितले.