Sangli Samachar

The Janshakti News

पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यातून नवी दिशा मिळेल : शिवराज काटकर !



| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि. १४ मे २०२४
प्रत्येक प्रश्नावर पत्रकारांनी भूमिका घ्यावी अशी प्रत्येकांची अपेक्षा असते. पण पत्रकारांवर हल्ला होतो त्यावेळी पत्रकार संरक्षण कायदा करण्यात येतो परंतू त्याच्या अंमलबजावणीचे पत्र मिळत नाही, अशा वेळी खरचं समाज आमच्या पाठीशी आहे का ? हा प्रश्न सातत्याने पत्रकारांना पडतो. असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी केले.

येथील स्व. वसंतराव पुदाले मित्र मंडळ व स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंतराव पुदाले यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्ताने पत्रकारांचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

स्वागत पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी केले. शिवराज काटकर म्हणाले, पत्रकारांचा स्नेहमेळावा आयोजीत करून जिल्हयात आदर्श घालून दिला आहे. स्व. वसंतराव पुदाले मित्र मंडळाने जिल्हयातील पत्रकारितेला वेगळी दिशा दिली आहे. पलूस तालुक्यातला पत्रकार हा कणखर आहे. त्याने विचारलेल्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. ही वस्तुस्थिती आहे. यशवंत पाणीपुरवठा संस्था यशस्वीपणे सुरू होण्यासाठी वसंतराव पुदाले यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे विस्मरण कधी होवू देवू नका. पलूस शहराची झपाटयाने वाढ होत आहे. पुढच्या वीस वर्षात पलूस शहर गतीने बदलेले दिसेल. स्व. वसंतराव पुदाले दादांनी पलूसचे गावपण टिकवून ठेवले. पलूस शहराचा सांस्कृतिक व अर्थिक स्तर उंच व्हावा, असा विचार करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभा राहणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. पत्रकारांच्या समस्या मोठ्या आहेत. पत्रकारांसाठी सांगली जिल्हयात पहिल्यांदा हौसिंग सोसायटी पलूस मध्ये व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रास्ताविक करताना सुहास पुदाले यांनी स्व. वसंतराव पुदाले यांनी केलेले कार्य व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. पत्रकार हा समाजातील प्रश्न मांडत असतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी मंडळाने स्नेहमेळावा आयोजीत केला आहे. यावेळी गणपतराव पुदाले, हेमंत मोरे, विकास सुर्यवंशी, सुरेश गुदले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, डॉ. पंतगराव कदम पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन विष्णू सिसाळ, धोंडीराज महाराज सोसायटीचे अध्यक्ष विलास हजारे, अजित कुलकर्णी, अनिल कदम, ईश्वरा सिसाळ, पांडूरंग पुदाले, सतिश पवार, महेश माने, जगन्नाथ पुदाले, विजयसिंह कदम, संदीप पवार यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते. आभार डॉ. संपत पार्लेकर यांनी मानले.