Sangli Samachar

The Janshakti News

तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२४
मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा सांगलीत पार पडली. या सभेला उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, विश्वजित कदम आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी जाहीरपणे पुन्हा एकदा सांगलीची जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तुम्ही महाराष्ट्राचे वाघ असला तरी आम्हीही सांगलीचे वाघ आहोत असं विधान कदम यांनी ठाकरेंसमोर केले.

या सभेत विश्वजित कदम म्हणाले की, आम्ही जिल्ह्यातील तरुण पिढीचे काँग्रेस कार्यकर्ते खंबीरपणे काम करत होतो. ही जागा आम्हाला मिळेल अशी आशा बाळगली. लोकशाहीत प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात, तालुक्यात काम करताना प्रत्येकाला ही जागा आपल्याला मिळाली असं सांगत होते. त्यासाठी आम्हीही लढत होतो, पक्षश्रेष्ठींकडे ही जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह होता. परंतु दुर्दैवाने ही जागा मविआच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ही जागा आम्हाला मिळाली नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.


त्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्राचा वाघ म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन आहे. पण जसे तुम्ही वाघ आहात तसे सांगली जिल्ह्यातील आम्हीही वाघ आहोत. वाघ म्हणून जे काही आम्हाला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असंही काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.