Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधान पदासाठी भाजपमध्ये युद्ध; योगींचं नाव घेत इंडिया आघाडीच्या नेत्याचा बॉम्ब !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २५ मे २०२४
देशात तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेच्या हेतून भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच वातावरण निर्मिती केली होती. 'अब की बार चारसौ पार' म्हणत लोकसभा निवडणूक भाजपच जिंकणार, असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. तसेच भाजप किंवा महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असा दावा केला जात आहे. या दाव्याला मात्र विरोधकांकडून सुरुंग लावण्याचे काम केले आहे. वयाच्या मुद्द्यावरून आता नरेंद्र मोदी नाही तर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह हेच पंतप्रधान होतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, २०२४ मध्ये महायुतीने जादुई आकडा गाठला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर अमित शहा होतील. यासाठी त्यांनी शाह यांच्या विधानाचा संदर्भही दिला. अमित शाह यांनी 2019 मध्ये 75 वर्षांवरील सर्व लोकांना निवृत्त करत असल्याच सांगितले होते. तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर 75 वर्षांवरील कोणालाही भाजप संघटनेत किंवा सरकारमध्येही पद देणार नसल्याचा नियम केला आहे. त्यानुसार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांना घरी बसवले. कितीतरी नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आता तोच नियम पंतप्रधान मोदींनाही नक्कीच लागू होईल.


आता वयाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान पदाबाबत भाजपमध्ये चढाओढ असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. ते म्हणाले, भाजपात आता एकापाठोपाठ एक असे भयंकर युद्ध सुरू आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील एक एक करून बड्या नेत्यांचे पत्ते कट केले आहेत. यात शिवराज सिंह, वसुंधरा राजे, मनोहर खट्टर, डॉ. रमणसिंग, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचा नंबर आहे. त्यांना रेसमधून बाजूला केले तर अमित शाह यांच्या पंतप्रधान पदाचा मार्ग आपोपच मोकळा होणार आहे, असेही केजरीवाल म्हणाले. भाजपातून अमित शाह Amit Shah यांना पंतप्रधान करण्यासाठी खटाटोप सुरू आहे. त्यातूनच भाजपमध्ये शीत युद्ध सुरू झाले आहे. अमित शहा यांना पंतप्रधान होण्याची घाई झालेली आहे. मात्र भाजपातील अनेक नेत्यांना शाह हे पंतप्रधान म्हणून नको आहेत. वयाची अट इतरांना लागू असून ती माझ्यासाठी लागू होत नाही, असे मोदींनी कुठेही सांगितलेले नाही, याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले आहे.