Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत गुलाल कोणाचा, दोन्ही पाटलांच्या दाव्याने सट्टा बाजार तेजीत ?| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातील यंदा लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक राज्यात नव्हे तर देशात चर्चेची बनवली. 

महाविकास आघाडीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना अजूनही काँग्रेसचे नेते त्यांच्यावर कारवाईचा ब्र सुद्धा काढत नाहीत. त्यामुळे भाजपचे खासदार संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील  आणि अपक्ष विशाल पाटील या तीन पाटलांच्यात कुस्ती झाल्याने निकाल काय लागणार ? याबाबत अजूनही कोणाला राजकीय अंदाज आलेला नाही. त्यामुळे डाव प्रतिडावामुळे आखलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे अजूनही कोणता उमेदवार निवडून येणार ? हे ठाम सांगू शकत नाही. त्यामुळे सट्टाबाजार ही कोमात गेला आहे. खासदार संजय काका पाटील हॅट्रिक करणार की विशाल पाटील खासदार होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजपचे संजय काका पाटील यांच्यात पक्षांतर्गत असणारी नाराजी शिवाय विशाल पाटील यांच्या बद्दल शिवसेना राष्ट्रवादीची दुभंगलेली मते यावरच सांगली लोकसभेचा निकाल अवलंबून असणार आहे. असे असताना दोन्ही उमेदवाराकडून विजयाचा दावा केला जात आहे. त्यामुळे सट्टा बाजारात दोन्ही पाटलांच्या नावाचा भाव तेजीत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केल्यानंतर 4 जूनला निकाल काय लागणार याबाबत उत्कंठा वाढली आहे. सांगलीमध्ये झालेल्या त्रिशंकू लढतीत कोण बाजी मारणार याबाबत राजकीय जाणकार सुद्धा संभ्रमात पडले आहेत. तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल सामन्यानंतर आता सट्टाबाजार मधील हौशी लोकांचे लक्ष आता चार जूनकडे लागले आहे.


कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारावर सट्टा बाजारात ही तितकेच महत्त्व वाढले असून भाव ही तेजीत आहेत. एकीकडे संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवून हॅट्रिक करण्याच्या मनस्थितीत आहेत. लोकभावना आणि जनभावना लक्षात घेत विशाल पाटील हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे निकालाचा अंदाज सांगली लोकसभा मतदारसंघातील सध्या तरी अनेकांना येत नाही. सट्टा बाजारात सध्या संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांचाच भाव तेजीत आहे. पण निवडून कोण येणार याबाबत अजूनही कोणाला राजकीय अंदाज आलेला नाही. निकालाचा दिवस जसा जवळ येत आहेस तसे सांगली लोकसभेच्या निकालाची उत्कंठा लागून राहिली आहे. त्यामुळे सट्टा बाजारात ही दोघांचे भाव वाढत असून निकालाची तारीख जवळ येईपर्यंत आणखी भाव वाढेल, असा अंदाज आहे.