Sangli Samachar

The Janshakti News

'यापूर्वी पंतप्रधानांचे निवासस्थान आस्था, आदर आणि मानवतेचे प्रतिक होते, पण आता ते वसुली निवास झालंय'; डॉ. आंबेडकर यांची टीका



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
निवडणूक रोखे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. भाजप देशभरात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूली करत आहे. मोदींच्या राज्यात वसुलीराज आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सांगली लोकसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित मिरज येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, जयश्री पाटील, आरपीआयचे राजेंद्र गवई, वंचितचे सोमनाथ साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, यापूर्वी प्रधानमंत्री यांचे निवासस्थान म्हणजे आस्था, आदर आणि मानवतेचे प्रतिक होते. मात्र, आता ते वसुली निवास झालं आहे. ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकांना धमकावत निवडणूक रोखे घ्यायला भाग पाडले जात आहे.

17 लाख हिंदूंनी देशाचे नागरिकत्व सोडले

ते म्हणाले, "जर भाजपची हिंदू राष्ट्र संकल्पना होती, तर लोकसभेत सादर केलेल्या अकडेवारी नुसार २०१४ पासून प्रश्न विचारेपर्यंत देशातील १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश आणि देशाचे नागिकत्व सोडले आहे, तेच १९५० पासून २०१४ पर्यंत फक्त सात हजार नागरिकांनी केलं होतं, जे लोक गेलेत त्यांची आर्थिक स्थिती प्रत्येकी सुमारे 50 कोटी रुपयांची होती, याचा अर्थ लोक यांच्या वसुलीला वैतागले आहेत", असेही ते यावेळी म्हणाले.

मोदींनी सरकारी प्रकल्प विकले

डॉ. आंबेडकर म्हणाले, "व्यसनाधीनन व्यक्ती आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी शेवटी घरातील भांडी विकतो. त्याप्रमाणे मोदींनी देशाला कर्जाच्या खाईत लोटलं आहे. आता ते देश चालवण्यासाठी सरकारी रेल्वे, कारखाने, सार्वजनिक जागा, उपक्रम खासगी लोकांना विकत आहेत, त्यांना सत्तेचे व्यसन लागलं आहे, त्यामुळे लोकांनी मतदान करताना विचारपूर्वक करावे."

रेमडिसिव्हर कंपनीने दिले 18 कोटींचे निवडणूक रोखे

यावेळी बोलताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर गंभीर आरोप केला, ते म्हणाले, "ज्या रेमडीसिव्हर औषधाला जगभर बंदी आहे, ते रेमडीसिव्हर मोदींनी देशभर दिले. रेमडीसिव्हरला डब्ल्यूएचओने बंदी घातली होती. कारण त्याचे साईड इफेक्ट होते. मात्र, त्यांना त्याच्याशी काहीही देणं-घेणं नव्हतं, त्याच औषधाच्या निर्मिती कंपनीकडून भाजपने 18 कोटींचे निवडणूक रोखे घेतले आहेत."


विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

विशाल पाटील म्हणाले, "माझ्या बाजूनं वार निश्चितपणे फिरलंय. या वाऱ्याचं आता वादळ झालं आहे. त्यामुळं लोक आता भाजपच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार, भाजपला पराभव दिसू लागला आहे. राज्यातील आणि देशातील नेते सांगलीत येऊन अपक्ष उमेदवारावर बोलतात. यातूनच कळते की विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे. मागच्या लोकसभेला मी वंचिकडे चर्चेला गेलो नाही. त्याचाच परिणाम म्हणून माझा पराजय झाला होता, हे प्रांजळपणे मान्य करतो. मात्र, यावेळी वंचित माझ्यासोबत असल्याने माझा विजय होईल," असा दावा त्यांनी यावेळी केला.