yuva MAharashtra विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?

विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर निर्दोष का सुटले?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष यूएपीए न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना दोषी ठरवले आहे. तर, विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्या अभावी आणि त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष सुटका झाली, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर (वय,६७) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने २० साक्षीदार तपासले, तर बचाव पक्षाने दोन साक्षीदार तपासले. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धेविरोधात मोहीम राबवत असल्याने आरोपींनी त्यांची हत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर २०१४ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यानंतर सनातन संस्थेशी संबंधित ईएनटी सर्जन डॉ. विरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली. तावडे हा खुनाचा सूत्रधार असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता.

दाभोलकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र) नावाची संघटना चालवत असत. सनातन संस्था या संस्थेच्या कार्याच्या विरोधात असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात सर्वप्रथम सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे शूटर म्हणून नोंदवली होती. त्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दाभोलकरांचे मारेकरी असल्याचा दावा करत त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीने वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली.

आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम १२९ (ब) (कट रचणे), ३०२ (हत्या), शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि यूएपीएच्या कलम १६ (दहशतवादी कृत्यासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दाभोलकरांच्या हत्येनंतर पुढील चार वर्षांत भारतभरात आणखी तीन बुद्धिवादी आणि कार्यकर्त्यांची हत्या झाली. गोविंद पानसरे (कोल्हापूर, फेब्रुवारी २०१५), कन्नड विद्वान आणि लेखक एम. एम. कलबुर्गी (धारवाड, ऑगस्ट २०१५) आणि पत्रकार गौरी लंकेश (बेंगळुरू, सप्टेंबर २०१७).

निर्दोष सुटलेल्या आरोपींविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार

दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. मात्र न्यायालयाने ज्या आरोपींना निर्दोष सोडले, त्याविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.