Sangli Samachar

The Janshakti News

खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ मे २०२४
शिमगा संपला तरी कमीत्व मागे उरते असे म्हटले जाते, याचे प्रत्यंतर सध्या सांगली जिल्ह्यातील जनतेला येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप आणि जिल्ह्याचे राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. कालच खासदार संजय पाटील यांनी काँग्रेस नेते डॉक्टर विश्वजीत कदमन सह विशाल पाटील यांच्यावर जोरदार आणि परखड टीका केली. तर ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली नाही त्यांचा हिशोब व्याजासकट चुकता करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. याला उत्तर देण्यासाठी आज अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन आरोपांच्या फेरी झाडल्या आहेत.

यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले की, चंद्रहार पाटील यांचा या निवडणुकीत बळी गेला, याचे दु:ख मलाही आहे. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूनेच त्यांचा घात केला आहे. ते म्हणाले की, भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक षडयंत्रे आखली. ती फसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी भावना खासदार व्यक्त करीत असले तरी याच दिलदार शत्रूशी संगनमत करुन त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही.


लोकसभा निवडणुकीत षडयंत्र रचले गेल्यानंतर खासदारांचा आत्मविश्वास वाढला होता. तीन ते चार लाख मतांनी विजयी होऊ, असा आत्मविश्वास त्यांना होता. सांगलीतील जनतेने षड्यंत्र ओळखले. तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झाला. सांगलीत भाजप कमकुवत झाली आहे. उमेदवारही कमजोर दिला. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवली. त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनी मदत करावी, अशी अपेक्षा बाळगली. ते झाले नाही. त्यातूनच ते काँग्रेस नेत्यांवर टीका करताहेत.

विश्वजीत कदम यांच्याशी दोस्ती अतूट

विशाल पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले. त्यांच्या पाठीशी दादाप्रेमी जनता उभी आहे. आमची एकी अभेद्य आहे. माझा दोस्त दिलदार आहे, ही दोस्ती आता तुटणार नाही. खासदार त्यांना धमक्या देत आहेत. पण, त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहून अडचणीत धावून येईन.

चंद्रहार यांच्याबद्दल मला सहानुभूती

विशाल पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील यांचा जिल्ह्यातील एका राजकीय डावात बळी गेला. त्यांच्याबद्दल मला सहानुभुती आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान होऊ नये, अशी आमची भावना होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम याबाबत भिती व्यक्त केली होती. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूच्या चौकडीने ठरवून चंद्रहार पाटील यांचा वापर केला.

हतबलतेमुळे माझे फोटो व्हायरल

खासदारांकडे चांगले काही सांगण्यासारखे नव्हते. सर्व खेळ्या अपयशी ठरल्यानंतर हतबलतेपोटी त्यांनी माझे काही फोटो व्हायरल केले. फेक न्यूज फिरवल्या. त्याविरोधात आम्ही तक्रारही दाखल केली आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्ही संस्कार सोडला नाही परंतु खासदारांनी सर्व मर्यादा ओलांडल्या 

संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी कधीही मर्यादा होणार नाही माझ्यावर ते संस्कारच नाहीत असे सांगून विशाल पाटील म्हणाले की खासदाराने मात्र आपल्या सर्व मर्यादा ओलांडत माझा एकेरी उल्लेख केला तर आमचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर बिन बुडाचे आरोप केले. असो, कदाचित हा त्यांच्या संस्काराचा भाग असू शकेल. मला त्याबाबत काही बोलायचं नाही, असेही विशाल पाटील म्हणाले.

तुम्ही कधी युतीधर्म पाळला ?

विश्वजीत यांना आघाडीधर्म शिकवणाऱ्या संजयकाकांनी कधीच युतीधर्माचे पालन केले नाही. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेला त्यांनी काय केले, हे पक्षालाही माहित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते कोणाच्या गाडीतून फिरत होते, हेही जनतेला माहित आहे, असे विशाल पाटील यांनी सांगितले.