Sangli Samachar

The Janshakti News

मोदींनी जाहीरपणे साधली निवडणुकीच्या "विज्ञानाची केमिस्ट्री"; पण आकड्यांच्या जंजाळात अडकली विरोधकांची आघाडी !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २७ मे २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार अशी निवडणुकीची घोषणा देत संपूर्ण निवडणूक तिच्याभोवतीच फिरवत ठेवली. या निमित्ताने मोदींनी जाहीरपणे निवडणुकीचे "विज्ञान" आणि "केमिस्ट्री" साधून घेतली, पण विरोधक मात्र मोदींनी टाकलेल्या आकडेमोडीच्या जाळ्यात अडकले. हे स्वतःच मोदींनी वेगवेगळ्या जाहीर मुलाखतींमधून उघडपणे सांगितले, पण विरोधक मात्र आकडेमोडीच्या जंजाळातून अद्याप बाहेर यायला तयार नाहीत. निवडणूक म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे, तर निवडणूक म्हणजे "विज्ञान" आणि प्रचार म्हणजे "केमिस्ट्री" हे स्वतः नरेंद्र मोदींनी उच्चारलेले शब्द आहेत. या दोन्ही शब्दांचा मागमूसही विरोधकांच्या निवडणूक रणनीतीत दिसला नाही !

पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रत्येक मुलाखतकाराने 400 पार याविषयी प्रश्न विचारले आणि त्यांना मोदींनी वेगवेगळ्या प्रकारे जी उत्तरे दिली, त्यांचा निचोड हाच की, निवडणूक हे "विज्ञान" आहे आणि निवडणुकीच्या प्रचार ही "केमिस्ट्री" आहे!!


- आत्तापर्यंत आपण भाजपचा कार्यकर्ता आणि नेता म्हणून अनेक निवडणुका इतरांना लढवल्या आणि स्वतःही लढल्या. या प्रत्येक निवडणुकीत आपण कशा पद्धतीने बारकाईने नियोजन केले??,याचे रहस्य मोदींनी वेगवेगळ्या मुलाखतींमधून उघडपणे उलगडून सांगितले.

- ज्या निवडणुकीमध्ये "अँटी इन्कमबन्सी" हा फॅक्टर धोका देईल, असे वाटते तिथे बूथ लेव्हलला कार्यकर्त्यांना कामाला लावून जी मते आत्तापर्यंत कधीच भाजपला कमळ चिन्हावर मिळाली नाहीत, ती मते खेचून आणण्याचे प्रयत्न करणे

- राज्य किंवा देश पातळीवरच्या अँटी इन्कमबन्सीचा सामना बूथ पातळीवरच्या विरोधी मतांना आपल्याकडे खेचून घेऊन करणे. त्यासाठी प्रचाराचे मुद्दे स्थानिक ते राष्ट्रीय असे फिरवत राहणे

- कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत भाजपला अगदी 2/3 किंवा 3/4 मते मिळाली तरी सगळी 100 % मते एकाच पक्षाला कधीच मिळत नाहीत अशावेळी मतदान 100 % का झाले नाही?? त्याची कारणे शोधून काढून जे मतदान झाले नाही, ते मतदान प्रत्येक वेगवेगळ्या निवडणुकीत घडवून आणणे, यासाठी कार्यकर्त्यांच्या पातळीवर बारकाईने नियोजन करणे

- स्वतंत्र फीडबॅक यंत्रणा उभी करणे त्या फीडबॅक वर आधारित प्रचाराचे नियोजन आणि रणनीती आखणे या सगळ्या बाबींमध्ये पर्सनली लक्ष घालणे

ही सगळी रहस्ये मोदींनी उघडपणे मुलाखतीत स्पष्टपणे उलगडून सांगितली. त्यात कुठेही त्यांनी आडपडादा ठेवला नाही. त्यामुळ अब की बार 400 पार या आपण फेकलेल्या आकड्याच्या जाळ्यात विरोधक अडकले. मोदी 400 पार जाणार की 350 मध्ये अडकणार की 272 चा आकडाही गाठणार नाही??, याचीच चर्चा विरोधक करत बसले. मोदींना हरवण्यासाठी आपल्याला बहुमताचा आकडा म्हणजे 272 पार करावे लागेल हेच विरोधक विसरले, असा टोलाही मोदींनीच या मुलाखतींमधून हाणला.

तरी देखील विरोधक भाजप 180 वर अडकेल. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी 220 च्या पुढे जाणार नाही, असेच म्हणत बसले. यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडांचे उदाहरण उत्तम ठरले. भाजपचा 180 चा आकडा पवन खेडांनीच सहाव्या टप्प्यानंतर जाहीरपणे सांगितला, पण पवन खेडा असोत किंवा "दक्षिण में साफ, उत्तर में हाफ", या आपल्या कथित सिद्धांताला चिकटून राहणारे जयराम रमेश असोत, बाकी कुठलेही प्रवक्ते किंवा विरोधकांचे दिग्गज नेते यापैकी कोणीच विरोधकांच्या नेमका आकडा सांगू शकले नाहीत. आम्ही बहुमताच्या आसपास पोहोचू, बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानात पदाचा नेता निवडू वगैरे मोघम उत्तरे विरोधक देत बसले.

प्रत्यक्षात मतदान म्हणजे केवळ आकडेवारीचा किंवा टक्केवारीचा खेळ नाही, तर मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचे बळ निर्माण करणे, त्यांच्या बळावर बूथ लेव्हलला नियोजन हे सगळे प्रकार गांभीर्याने करावे लागतात, याकडे विरोधकांचे पूर्ण दुर्लक्ष झाले.

त्या उलट टीव्हीवरच्या मुलाखती, सोशल मीडिया वरची कॅम्पेन्स आणि "महाराष्ट्र स्विंग स्टेट" आहे, असले "पवार बुद्धी"च्या माध्यमांनी निर्मिलेले नॅरेटिव्ह या पलीकडे विरोधकांची बुद्धीच गेली नाही.

- उघडा डोळे, आकडे वाचा नीट!!

भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील वेगवेगळ्या घटक पक्षांचे समाधान करून स्वतःच्या कमळ चिन्हावर 417 उमेदवार उभे केले. उरलेल्या साधारण 130 जागा त्यांनी मित्र पक्षांमध्ये वाटून दिल्या. त्या उलट काँग्रेसने आपण नेमक्या किती जागा लढवणार??, याचा आकडा कधीही जाहीररीत्या सांगितला नाही. उलट काँग्रेस 328 जागा लढवेल ,असे सांगून प्रत्यक्षात काँग्रेसच्या उमेदवारी संख्येची झेप 297 - 98 - 99 या पलीकडे गेलीच नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची उमेदवार संख्या 42, एम के स्टालिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघमची उमेदवार संख्या 32, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संख्या 21, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार संख्या 10, अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची उमेदवार संख्या 22 या संख्या"बळा"वर सगळे विरोधक मोदींच्या भाजपशी टक्कर घ्यायला निघाले, यातूनच खरं म्हणजे आकडेमोडीचे महत्त्व 2024 च्या निवडणुकीपुरते गळून गेले आणि मोदींनी सांगितल्याप्रमाणे निवडणूक म्हणजे "विज्ञान" आणि प्रचार म्हणजे "केमिस्ट्री" हे तत्त्व प्रस्थापित झाले.

विरोधकांकडे नेते दिग्गज, पण पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची वानवा!! अशा स्थितीत विरोधकांची 2024 ची निवडणूक फक्त आकडेमोडी पुरतीच मर्यादित राहिली. त्यांनी ना निवडणुकीचे "विज्ञान" समजून घेतले, ना प्रचाराची "केमिस्ट्री" समजून घेतली!! आता मतदानाचा फक्त शेवटचा टप्पा उरला आहे. तो 1 जूनला पार पडला की, ही आकडेमोड देखील "मर्यादित" आणि टक्केवारी "अतिमर्यादित" ठरेल आणि विरोधक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या नावाने बोंब मारायला मोकळे होतील!!